• Tue. Apr 29th, 2025

मनोज जरांगेंची महत्त्वाची घोषणा, आमरण उपोषण स्थगित; पुन्हा राज्यभरात फिरुन रान उठवणार

Byjantaadmin

Feb 26, 2024

जालना: गेल्या काही तासांमध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे सुरु असलेले आपले आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या १६ दिवसांपासून मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु होते. परंतु, अंबड तालुक्यातील जमावबंदीचे आदेश, मराठवाड्याच्या काही भागांमध्ये खंडित करण्यात आलेल्या इंटरनेट सेवा तसेच राजकीय नेत्यांकडून जरांगे यांच्या वक्तव्याचा सुरु झालेला निषेध या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी तुर्तास दोन पावले मागे घेत मराठा आंदोलनाची रणनीती नव्याने ठरवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. 

या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी सोमवारी दुपारी अंतरवाली सराटी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आमरण उपोषण स्थगित करत असल्याचे जाहीर केले. आता मी डॉक्टरांचा सल्ला घेऊन पुढे काय करायचे, हे ठरवेन. पुढील एक-दोन दिवस मी उपचार घेईन. त्यानंतर लगेच पुढचा दौरा घोषित करेन. संचारबंदीमुळे मराठा बांधवांना इकडे येणे शक्य नाही. त्यामुळे लोक सैरभैर झालेत. मी सुखरुप आहे. मला कोणीही कुठेही नेलेले नाही. तोपर्यंत मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु ठेवावे. BEED SAMBHAJINAGAR आणि जालना जिल्ह्यात इंटरनेट बंद केले आहे. त्यामुळे अफवा पसरत आहेत, त्या पसरुन देऊ नका, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

मनोज जरांगे पुन्हा राज्यभरात फिरणार

मराठा बांधवांच्या विनंतीनुसार, मी आमरण उपोषण स्थगित करत आहे. त्याचे रुपांतर साखळी उपोषणात करत आहे. मी आता गावागावत जाऊन मराठा बांधवांच्या भेटीगाठी घेणार आहे. लोकशाहीत प्रत्येकाला इतरांना भेटण्याचा मुलभूत अधिकार आहे. मी तुमच्याकडे येत आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed