जालना : मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांनी मुंबईच्या सागर बंगल्यावर जाण्याचा निर्धार केला होता. यानंतर त्यांनी परिसरातील राज्यभरातील मराठा बांधवांना मुंबईसाठी येण्याचे आवाहन केलेलं होतं. जालन्यातील अंबड तालुक्यात मराठा आंदोलक जमण्याची शक्यता असल्यानं जिल्हाधिकारी यांच्या वतीने संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत. मनोज जरांगे यांनी संचारबंदीचा आदेश आल्यानंतर अंतरवाली सराटीत जाण्याचा निर्णय घेतला. आंदोलकांनी आपापल्या घरी जावं, असं आवाहन देखील जरांगे पाटील यांनी केलं. आम्हाला मुंबईला जाऊ द्यायचं नाही त्यामुळं संचारबंदी लावण्यात आली आहे. सागरची दारं उघडी आहेत, असं सांगितलं पण संचारबंदी लावण्यात आली, असं जरांगे यांनी म्हटलं. मराठ्यांची लाट विरोधात जाऊ देऊ नका, असंही ते म्हणाले.

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी केलेल्या आवाहनानंतर जालना जिल्ह्यात आणि इतर ठिकाणी झालेले रास्ता रोको पाहता तसेच काल दिनांक २५ रोजी मनोज जरांगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर जाण्यासाठी निघाले होते. त्या पार्श्वभूमीवर बीड- सोलापूर- जालना या महामार्गावर तसेच अंबड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाज जमा होण्याची शक्यता असल्यानं या संदर्भात जालनाचे जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी माहिती घेऊन खात्री करुन संचारबंदीचा निर्णय लागू केला आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. कृष्णनाथ पांचाळ यांनी सोमवार दिनांक २६ म्हणजेच आज मध्यरात्री एक वाजल्यापासून अंबड तालुक्यामध्ये संचारबंदी लागू केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी असलेल्या अधिकाराचा वापर करत त्यांनी “वेळेअभावी सर्व संबंधितांना नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने ,मी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जालना मला प्राप्त अंगीभुत अधिकाराचा वापर करून फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) अन्वये संपूर्ण अंबड तालुक्यातील दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ चे रात्री एक वाजेपासून ते पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू करत आहे असे आदेश काढले आहेत “सदरील संचारबंदी आदेश दुकाने ,आस्थापना, यांनाही लागू राहतील ,तसेच कोणतेही प्रकारचे शस्त्र ,ज्वलनशील पदार्थ स्फोटके सोबत बाळगता येणार नाहीत.या संचारबंदी मधून पुढील बाबींना सूट असणार आहे. शासकीय निमशासकीय कार्यालय, शाळा महाविद्यालय, राष्ट्रीय महामार्ग इतर महामार्गावरील वाहतूक ,दूध वितरण, पिण्याचे पाणीपुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणाऱ्या आस्थापना, रेल्वे व्यवस्था, दवाखाना, वैद्यकीय केंद्रे, विद्युत पुरवठा ,प्रसार माध्यमे, मीडिया यांचा समावेश आहे.