• Tue. Apr 29th, 2025

अंबडच्या संचारबंदीनंतर मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात इंटरनेट बंद, मनोज जरांगेंचे तीन शिलेदार पोलिसांच्या ताब्यात

Byjantaadmin

Feb 26, 2024

जालना: मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरागे पाटील यांनी काल अंतरवाली सराटीत बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. फडणवीस माझ्या विरोधात कटकारस्थान करत आहेत, मला सलाईन मधून विष देण्याचा प्रयत्न केला जातोय असं म्हणत जरांगे यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केले होते. फडणवीस यांना माझा बळीच हवाय ना तर मी सागर बंगल्यावर येतो माझा बळी घ्या, असं म्हणत जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र, राज्य सरकारनं अंबड तालुक्यात संचारबंदी लागू केल्यानंतर जरांगे पुन्हा अंतरवाली सराटीत दाखल झाले. यानंतर राज्य सरकारनं पुढचं पाऊल टाकत छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात इंटरनेट बंद केलं आहे.जरांगे हे अंतरवली सराटी पासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या भांबेरी गावात रात्री मुक्कामाला होते. आज सकाळीच जरांगे यांचे तीन समर्थक शैलेंद्र पवार, बाळासाहेब इंगळे आणि शिवबा संघटनेचे श्रीराम कुरणकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात हे सहकारी सक्रीय आहेत. जरांगें यांनी मुंबईला जाण्याचा निर्धार केल्यानंतर हे तिघेही मुंबईला जाण्याच्या तयारीला लागली होते. यामुळेच आज २६ फेब्रुवारी सकाळी या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

जरांगे पुन्हा अंतरवालीत, सगेसोयरेच्या मागणीवर ठाम

मनोज जरांगे आज मुंबईकडे निघणार होते. मात्र, राज्य सरकारच्यावतीनं जालना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. यानंतर मनोज जरांगे यांनी पुन्हा अंतरवाली सराटीत जाण्याचा निर्णय घेतला. अंतरवाली सराटीत दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी सगेसोयरेच्या अधिसूचनेवर ठाम राहणार असल्याचं म्हटलं. संचारबंदी उठवल्यानंतर पुन्हा मुंबईकडे सागर बंगल्यावर जाणार असल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलं. याशिवाय जरांगे यांनी आज देखील देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मनोज जरांगे भांबेरी मधून अंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed