केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अहमदपूर येथे 190 किमी लांबीच्या 3946 कोटी रुपयांच्या महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन
एनएचएआय च्या माध्यमातून 18.72 लाख क्यूबिक मीटर गाळ काढून लातूरमध्ये जलसंवर्धनाचे कामे
नागपूर ते रत्नागिरी महामार्गामुळे मराठवाडा आणि विदर्भाची कनेक्टिव्हिटी गतिमान होणार.
लातूर/अहमदपूर, दि.23 : 190 किमी लांबीच्या रु 3946 कोटींच्या महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज करण्यात आले.

अहमदपूर येथील भकतस्थळ येथे आयोजित राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण व भूमिपूजनच्या उदघाटनप्रसंगी श्री गडकरी म्हणाले, विदर्भातील बुटीबोरी पासून कोकणापर्यंत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातून जाणारी नवीन लाईफ लाईन तयार झाली आहे. या रस्त्यामुळे कृषी उत्पादन बाजारपेठेला चालना मिळाली आहे. मागासलेल्या भागाच्या विकासासाठी या रस्त्याचा निश्चित उपयोग होईल. नागपूर ते रत्नागिरी 920 किमी लांबीच्या महामार्गासाठी 30 हजार कोटी रुपये खर्च केल्याचे त्यांनी सांगितले. गडकरी म्हणाले महाराष्ट्रातील नांदेड येथील माहूरगड, तुळजापुर येथील तुळजाभवानी आणि कोल्हापुरातील महालक्ष्मी या तीन प्रमुख शक्तीपीठाना जोडणारा भक्ती मार्ग असणार आहे. जिल्ह्याची पाणी टंचाई दूर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या कामातून नांदगाव, सारोळा सह 22 ठिकाणी तलावाचे खोलीकरण करून 18.72 लाख क्युबिक मीटर पाण्याचे स्टोरेज वाढवून जलसंवर्धन करण्यात आल्याचे श्री. गडकरी यांनी सांगितले. लातूर जिल्ह्यातील सर्व लोक प्रतिनिधींनी जलसंवर्धन कामाकडे लक्ष द्यावे अशी विनंति त्यांनी यावेळी केले.

शेतकऱ्यांनी शेती समृध्द करण्यासाठीं बायोमास पासून डांबर, इथेनॉल तयार करण्याचे आवाहन श्री गडकरी यांनी केले.पुढील काळामध्ये विमानाचे हवाई इंधन निर्माता म्हणून शेतकरी बनावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. श्री गडकरी यांच्या नेतृत्वात मागील दहा वर्षात नांदेड व लातूर जिल्हयात महामार्गाच्या कामाचे विस्तार केल्याबद्दल क्रीडा मंत्री संजय बनसोडे, खासदार सुधाकर श्रृंगारे आणि खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी आभार मानले.श्री गडकरी यांनी समर्पित केलेल्या प्रकल्पांमध्ये खालील रस्त्यांवर चौपदरीकरण आणि दुपदरी रस्त्यांच्या बांधकामाचा समावेश आहे:

औसा ते चाकूर राष्ट्रीय महामार्गावरील 58.51 किमी लांबीचा काँक्रीट रस्ता रु. 1572 कोटी.
चाकूर ते लोहा राष्ट्रीय महामार्गावरील 73.35 किमी लांबीचा काँक्रीट रस्ता रु. 2023 कोटी.
आष्टामोड ते आष्टा आणि टिवटग्याळ ते मलकापूर (उदगीर) राष्ट्रीय महामार्गवरील रस्त्याचे पेव्हड शोल्डर सहित दुपदरीकरण 82 कोटी रुपयांचा 5.82 किमी
श्री गडकरी यांनी खालील प्रकल्पांची पायाभरणीही केली.
राष्ट्रीय महामार्ग 752K वरील कोपरा ते घारोळा 26 किमी रस्त्याची सुधारणा रु. 139 कोटी
राष्ट्रीय महामार्ग 63 वरील खारोळा पाटी ते बामणी 6.4 किमी लांबीचा रस्त्याची सुधारणा रू 35 कोटी
रा. म. 63 वरील बोरगांव काळे ते मुरुड अकोला आणि लातूर विमानतळ जंक्शन ते महिला तंत्रनिकेतन 19.5 किमी रस्त्याची सुधारणा रू 95 कोटी
यावेळी कार्यक्रमासाठी क्रिडा, युवा कल्याण व बंदरे मंत्री संजय बनसोडे, खासदार सुधाकर श्रृंगारे, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार रमेश कराड, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार अभिमन्यू पवार, एनएचएआय चे तांत्रिक सल्लागार बाळासाहेब थेंग,जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, एनएचएआय चे प्रादेशिक अधिकारी संतोष शेलार, प्रशांत देगडे, प्रकल्प संचालक स्वप्नील कासार आणि अभियंता कृष्णा माने आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशिष आसाटी यांनी केले. सूत्रसंचालन रेणूका देशकर यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व कारंजा-मानोरा चे आमदार राजेंद्र पाटणी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.तसेच यावेळी धाराशिव जिल्ह्यातील 122.9 कोटी रुपयांच्या 3 राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्पांचे भूमिपूजन ऑनलाईन करण्यात आले. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, नीती आयोगाचे क्षमता बांधणी सल्लागार प्रवीणसिंह परदेशी, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे, पोलीस अधिक्षक अतुल कुळकर्णी आणि प्रकल्प संचालक संजय कदम कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.