लातूर : लातूर महापालिकेच्या वतीने विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली. यासाठी गुरुवारी (ता. २२) अठरा केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. यात काही पदांसाठी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त प्रश्न विचारल्याने उमेदवारही चकीत झाले. ही परीक्षा मराठी व इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांतून घेणे अपेक्षित असताना काही पदांसाठी केवळ इंग्रजी माध्यमातूनच परीक्षा घेण्यात आल्याने उमेदवारांत नाराजी आहे.

महापालिका स्थापनेला एक तप झाला, तरी पदभरती केली जात नव्हती. महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने आकृतिबंधच मंजूर केला जात नव्हता. पण, राज्य शासनाने अत्यावश्यक पदे भरण्यासाठी महापालिकेला काही महिन्यांपूर्वी परवानगी दिली. त्यानुसार आता टीसीएस कंपनीच्या माध्यमातून ऑनलाइन परीक्षा घेऊन ही पदभरती केली जात आहे. वेगवेगळ्या पदांसाठी गुरुवारी अठरा परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा झाली. हजारो उमेदवारांनी ही परीक्षा दिली. राज्यात मराठी भाषेला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे कोणतीही पदभरती करताना मराठी व इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांतून परीक्षा घेतल्या जात आहेत. पण, येथे मात्र काही पदांकरिता केवळ इंग्रजी माध्यमातूनच परीक्षा घेण्यात आल्याने उमेदवारांमध्ये नाराजी आहे. या परीक्षेकरिता पोर्टलवर अभ्यासक्रम देण्यात आला होता. पण, आज झालेल्या काही पदांसाठीच्या परीक्षेत या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त प्रश्न विचारण्यात आल्याचा प्रकार घडला. त्यामुळे उमेदवारांनी ते प्रश्न तसेच सोडून देण्याची वेळ आली.
सहायक कर अधीक्षक, वैद्यकीय अधीक्षक, विधी अधिकारी, कर निरीक्षक, लिपिक, पर्यावरण अधिकारी, व्हॉल्व्हमन अशा विविध १८ पदांसाठी ही परीक्षा झाली. आज आणखी दहा पदांसाठी परीक्षा आहे. ज्या पदांसाठी पदवीपेक्षा पुढील पात्रता आहे, त्यांचे माध्यम इंग्रजी होते. दहावी, आयटीआयसाठीच्या पदांसाठी मराठी माध्यमातून परीक्षा घेण्यात आली. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त प्रश्न विचारले गेले असतील, तर प्रत्येक उमेदवाराला टीसीएसकडून एक लिंक दिली जाणार आहे. उमेदवार तक्रार दाखल करू शकतो.
– मयूरा शिंदेकर, उपायुक्त, महापालिका.
महापालिकेच्या वतीने टीसीएस कंपनीने घेतलेल्या आजच्या या परीक्षेत सहायक कर अधीक्षक व विधी अधिकारीपदासाठी मी परीक्षा दिली आहे. या दोन्ही परीक्षांमध्ये अभ्यासक्रमाव्यतिरिक्त प्रश्न विचारले गेले. कर्नाटक, आंध्र प्रदेशच्या महापालिकेचे अधिनियम विचारले गेले. इंग्रजी माध्यमातून ही परीक्षा घेतली आहे. इतकेच नव्हे तर उमेदवारांकडे काहीही कागदपत्रे राहू नये म्हणून हॉलतिकीटही परत घेण्याचा प्रकार घडला. यासंदर्भात महापालिकेकडे तर तक्रार करण्यात येणार आहेच, पण न्यायालयातही दाद मागण्यात येणार आहे.
– ॲड. सूरज साळुंके, लातूर