बेळगाव : चिकोडी व बेळगाव या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून (Loksabha Election) काँग्रेसकडून (Congress) प्रत्येकी दोन उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. दोन्ही मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारांची नावे आठवडाभरात जाहीर केली जातील, यावेळी महिला उमेदवार असणार नाही, अशी माहिती जिल्हा पालकमंत्री (Guardian Minister Satish Jarkiholi) यांनी प्रसारमध्यमांना दिली.चिकोडी मतदारसंघातून कन्या प्रियंका (Priyanka Satish Jarkiholi) निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुरू आहे, पण प्रियंका निवडणूक लढविणार नाही. चिकोडीत नव्या चेहऱ्याला संधी दिली जाईल.

ते म्हणाले, चिकोडी व बेळगाव या दोन्ही मतदारसंघांत महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या सुपुत्रांचे नाव आघाडीवर आहे. पण, कोणाला संधी द्यावी याचा निर्णय हायकमांडकडूनच घेतला जाईल.नियोजित रिंगरोड व राष्ट्रीय महामार्गांच्या अन्य कामांच्या कोनशिला समारंभाच्या निमित्ताने जारकीहोळी बेळगावात होते. यावेळी त्यांनी संवाद साधला. प्रियंका जारकीहोळी यांच्या उमेदवारीबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले. चिकोडीमधून इच्छुक असलेल्यांची नावेही त्यांनी सांगितली. काँग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते इच्छुक असताना जारकीहोळी कुटुंबातील उमेदवार देणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीसाठी माझ्या नावाची चर्चा सुरू होती हे सत्य आहे. पण, पक्षातील अन्य निष्ठावंतांसाठी निवडणुकीतून माघार घेतल्याचे ते म्हणाले.दोन्ही मतदारसंघात जातीय समीकरणे महत्त्वाची ठरणार असली तरी विजयी होण्याची क्षमता असलेल्यांना उमेदवारी देण्याकडे काँग्रेस पक्षाकडून प्राधान्य दिले जाणार आहे. बेळगाव शहरातील खाऊ कट्टा येथील दुकानगाळ्यांच्या चौकशीबाबतही त्यानी माहिती दिली. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून खाऊ कट्ट्याची चौकशी सुरू आहे. संबंधिताना नोटीसही बजावली आहे. चौकशी व कारवाईत काही कायदेशीर बाबी लक्षात घ्याव्या लागणार आहेत. त्यानंतरच पुढील कार्यवाही होईल, असे त्यांनी सांगितले.