पुणे : महाविकास आघाडीच्यावतीनं गेल्यावर्षी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून वज्रमूठ सभांमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकार विरोधात आक्रमक भूमिका मांडली जात होती. राज्यातून बाहेर जाणारे उद्योग, महाराष्ट्रातील विविध प्रश्न, केंद्र सरकारकडून राज्याला मिळणारी वागणूक याबाबत मविआच्या वज्रमूठ सभांमधून हल्लाबोल करण्यात येत होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत राजकारण आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सभा घेतल्यानं होणारी गैरसोय हे कारण देत रद्द करण्यात आलेल्या वज्रमूठ सभांना पुन्हा सुरुवात होत आहे. पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये वज्रमूठ सभेचं आयोजन केलं जाणार आहे. या सभेला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत.गेल्या वर्षी महाविकास आघाडीच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. छत्रपती संभाजीनगर, मुंबई आणि नागपूरमध्ये सभा पार पडल्या होत्या. पुण्यातील सभेच्या संयोजनाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. मात्र, सभा स्थगित करण्यात आल्या होत्या. उद्या पुण्यात होणाऱ्या वज्रमूठ सभेच्या माध्यमातून महाविकास आघाडी शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. या सभेतून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं जाणार आहे.नाना पटोले यांनी वज्रमूठ सभेतून लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार असल्याची माहिती दिली. शरद पवार महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी वज्रमूठ सभेच्या आयोजनसाठी मविआतील घटकपक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून समन्वय साधून काम सुरु असल्याची माहिती दिली. मविआ म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं जगताप यांनी म्हटलं.

महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागाबाबत मविआचं जागा वाटप रखडलेलं आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची देखील फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीनं गेल्यावर्षी एकत्र येत कसबा पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर भाजप उमेदवार हेमंत रासणे यांचा पराभव करुन विजयी झाले होते. पुण्यातील वज्रमूठ सभेच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती करण्याचा मविआचा प्रयत्न आहे.