मुंबई : माजी लोकसभा अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी यांचं निधन झालं. दोन दिवसांपूर्वी हार्ट अटॅक आल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. परंतु आज पहाटे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे बुलढाणा दौऱ्यावर होते. ठाकरेंनी सच्चा शिवसैनिक हरपल्याच्या भावना व्यक्त करत मनोहर जोशींना श्रद्धांजली अर्पण केली. जोशींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी ठाकरे तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत.

ज्यावेळी बेळगाव कारवार सीमा प्रश्नावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक झाली, तेव्हा त्यांच्यासोबत दत्ता साळवी आणि मनोहर जोशीच होते. ते जीवाला जीव देणारे निष्ठावान शिवसैनिक होते. हे फार मोठं दुर्दैव आहे आणि मी नेमका बुलढाणा दौऱ्यावर आहे. परंतु लवकरात लवकर मुंबईला येत आहे.
शिवसेना परिवार आणि ठाकरे कुटुंबाकडून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.या सर्व शिवसैनिकांमुळे शिवसेना प्रत्येक वेळी संकटांवर मात करुन उभी राहते. मनोहर जोशी हे शिवसेनेत बाळासाहेबांचे पहिल्या फळीतील सहकारी होते. त्यांच्याकडून स्फूर्ती घेत आजही अनेक तरुण शिवसैनिक काम करत आहेत. त्यामुळेच जेव्हा जेव्हा शिवसेनेवर घाव घालण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा ती संपत नाही, तर उलट जोमाने वाढते. त्यांनी शिवसेना रुजवण्यासाठी आयुष्याची महत्त्वाची वर्ष वेचली, तीच मुळं आज पक्षाला उभारी देत आहेत, अशा भावनाही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या.