• Wed. Apr 30th, 2025

महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबिरात रोजगाराच्या संधींसह करिअरविषयी मिळणार मार्गदर्शन

Byjantaadmin

Feb 22, 2024

महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबिरात रोजगाराच्या संधींसह करिअरविषयी मिळणार मार्गदर्शन

·        24 फेब्रुवारी रोजी महारोजगार मेळाव्यात रोजगाराच्या संधी

·        23 व 24 फेब्रुवारीला रोजगार, स्वयंरोजगाराबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन

लातूर (जिमाका): राज्य शासनामार्फत लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागस्तरीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिरात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच रोजगार, स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. यामध्ये 23 व 24 फेब्रवारी 2024 रोजी होणाऱ्या शिबिरात उद्योग, कृषीपूरक उद्योग, स्वयंरोजगार, माहिती व तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) याविषयांतील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच 24 फेब्रुवारी 2024 रोजी भव्य नमो महारोजगार मेळावा होणार आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी युवक-युवतींनी https://nmrmlatur.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन राज्याचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि लातूर जिल्हा प्रशासनाने केले आहे.

लातूर येथील बार्शी रोडवरील शासकीय महिला तंत्रनिकेतन समोरील मैदानात विभागस्तरीय नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबीर होत आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबने, ‘सह्याद्री फार्म’ या शेतकरी उत्पादक कंपनीचे विलास शिंदे, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील रोहित पंढारकर, कर विषयक तज्ज्ञ राजीव रंजन, कुणाल क्षीरसागर, एडसील इंडिया लिमिटेडचे उत्तम गायकवाड, ‘करिअर कट्टा’ उपक्रमातील प्रमुख मार्गदर्शक दिनेश पवार, तसेच विविध क्षेत्रातील तज्ज्ञ महिला, वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शन ऐकण्याची संधी युवक-युवतींना 23 व 24 फेब्रुवारी रोजीच्या करिअर मार्गदर्शन शिबिराच्या निमित्ताने मिळणार आहे. 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 पासून मार्गदर्शन शिबीर सुरु होईल.

23 फेब्रुवारी रोजी यांचे लाभणार मार्गदर्शन

दिनेश पवार, मुख्य मार्गदर्शक, करिअर कट्टा: महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘करिअर कट्टा’ या उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. दिनेश पवार हे करिअर विषयक नव्या संधींबाबत मार्गदर्शन करणार आहेत. ‘चला करिअरचा मार्ग धरू’, ‘युवक विश्व बदलण्याची शक्ती’ आदी विषयांवरील व्याख्याते, तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक अशी त्यांची ओळख आहे.

उत्तम गायकवाड, महाव्यवस्थापक, एडसील इंडिया लिमिटेड : केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालय अंगीकृत कंपनी एजुकेशनल कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेड अर्थात एडसिल कंपनीचे महाव्यवस्थापक असलेले उत्तम गायकवाड यांचे मार्गदर्शन या शिबिरामध्ये लाभणार आहे.

महिलांसाठी स्वतंत्र परिसंवादाचे आयोजन : करिअर मार्गदर्शन शिबिरामध्ये 24 फेब्रुवारी रोजी महिलांसाठी स्वतंत्र परिसंवाद आयोजित करण्यात अयेणार आहे. यामध्ये वैद्यकीय, शिक्षण, व्यवसाय, उद्योग, प्रशासन यासारख्या विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामिगिरी करीत असलेल्या महिलांचा सहभाग असाणार आहे. या क्षेत्रामध्ये उपलब्ध असलेल्या रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी याविषयी याद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे.

24 फेब्रुवारी रोजीचे प्रमुख मार्गदर्शक

प्रशांत गिरबने, महासंचालक, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर : प्रशांत गिरबने यांना एंटरप्रेनरशिप आणि गुंतवणूक क्षेत्रातील कामाचा अनुभव आहे. तसेच बँकिंग आणि वित्तीय सेवा, व्यवसाय विकास आदी क्षेत्रांमध्ये काम केले आहे. सध्या ते मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.

विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी : सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी या शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असलेले विलास शिंदे हे 23 फेब्रुवारी रोजी करिअर मार्गदर्शन मेळाव्यामध्ये युवक-युवतींना मार्गदर्शन करतील. सन 2010 मध्ये स्थापन झालेल्या या शेतकरी उत्पादक कंपनीसोबत 10 हजार शेतकरी जोडले आहेत. भाजीपाला, फळे उत्पादन आणि निर्यात करण्यासोबतच त्यापासून विविध पदार्थांची निर्मिती या कंपनीमार्फत केली जात आहे.

रोहित पंढारकर, माहिती व तंत्रज्ञान तज्ज्ञ : माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात विविध नामांकित आस्थापनांमध्ये काम करण्याचा अनुभव असलेले रोहित पंढारकर यांना डाटा अॅनालिसिस, डिजिटल इमेज प्रोसेसिंग, अल्गोरिदम यामधील कामाचा अनुभव आहे. ते करिअर मार्गदर्शन शिबिरात डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच  एआय विषयी मार्गदर्शन करणार आहेत.

राजीव रंजन, कुणाल क्षीरसागर, (टॅक्स बडी) : कर नियोजन, आयटीआर फाइलिंग, टॅक्स नोटिस सोडवणे आणि जीएसटी फाइलिंग विषयी ‘टॅक्स बडी’चे राजीव रंजन आणि कुणाल क्षीरसागर हे मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये प्राप्तिकर, जीएसटी, भांडवली नफा आदी बाबींविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. रोजगार, स्वयंरोजगारासाठी अतिशय महत्वपूर्ण असलेल्या कर नियोजनविषयक या मार्गदर्शन सत्राचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्पर्धा परीक्षा विषयावर होणार मार्गदर्शन : स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय सेवेत येण्यासा इच्छुक असलेल्या युवक-युवतींना योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी करिअर मार्गदर्शन शिबिरात चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थी आयएएस, आयपीएस अधिकारी हे युवक-युवतींना मार्गदर्शन करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *