• Thu. May 1st, 2025

मनसे-भाजप युती जवळपास निश्चित, लोकसभेच्या दोन जागाही ठरल्या, शिंदेंची सीट राज ठाकरेंना?

Byjantaadmin

Feb 20, 2024

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीत ‘मनसे’ची भाजपसोबत युती होणार असून, महायुतीत समावेशाने ‘मनसे’ला राज्यात दोन जागाही मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या पार्श्वभूमीवर ‘मनसे’कडून वर्धापनदिनाच्या माध्यमातून नाशिक लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपाठोपाठ ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरेही आता नाशिकचे मैदान गाजवणार आहेत. ‘मनसे’चा गड अशी ओळख असलेले नाशिक राज ठाकरेंनी नवनिर्माणासाठी पुन्हा निवडले असून, येत्या ९ मार्च रोजी ‘मनसे’चा १८ वा वर्धापनदिन मुंबईबाहेर प्रथमच ठाकरेंच्या उपस्थितीत नाशिकमध्ये साजरा केला जाणार आहे.

लोकसभा निवडणूक एप्रिलमध्ये होणार असून, या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी सुरू झाली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे (शिंदे गट) असला, तरी नाशिकचे धार्मिक महत्त्व पाहता ही जागा भाजपने घ्यावी, यासाठी कोअर कमिटीने ताकद पणाला लावली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जानेवारीत राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या माध्यमातून श्रीकाळारामाचे दर्शन घेऊन नाशिकमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्या पाठोपाठ शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही नाशिकमध्ये श्रीकाळारामाचे दर्शन आणि राज्याचे अधिवेशन घेऊन लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल फुंकला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही नाशिकमध्ये शक्तिप्रदर्शन केले. त्यात आता ‘मनसे’चीही भर पडणार आहे.

मनसेला नाशिक का?

-मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिकपुरतेच ‘मनसे’चे अस्तित्व
-या महानगरांतच लोकसभा निवडणूक लढविण्याची रणनीती
-मनसेकडून नाशिकची जागा लढविण्यासाठी चाचपणी
-भाजप-शिंदे गटाशी जवळिकीमुळे महायुतीत समावेशाची चिन्हे
-महायुतीत मनसेला दोन जागा मिळणार असल्याची चर्चा
-नाशिकची एक जागा पक्की असल्याचा संबंधितांचा दावा

‘नवनिर्माणा’साठी पुन्हा निवड

‘मनसे’ची स्थापना २००६ मध्ये मुंबईत झाली असली, तरी ‘मनसे’ला चांगले यश नाशिकमध्येच मिळाले. सन २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘मनसे’ला राज्यातील १३ जागांपैकी सर्वाधिक तीन जागा नाशिकमधून मिळाल्या होत्या. २०१२ मध्ये महापालिकेत सत्ताही ‘मनसे’ला मिळाली होती. त्यामुळे मनसे हा नाशिकचा गड राहिला आहे. नाशिकमध्ये चांगले काम करूनही पदाधिकाऱ्यांमधील हेव्यादाव्यांमुळे नाशिकमध्ये ‘मनसे’चे पानिपत झाले होते. परंतु, आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘मनसे’ने ‘नवनिर्माणा’साठी पुन्हा नाशिकचीच निवड केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *