मुंबई: मुंबई प्रदेश काँग्रेसला लोकसभा निवडणुकीपूर्वी तिसरा धक्का बसण्याची शक्यता आहे. मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश करुन राज्यसभा खासदारकी मिळवलेली आहे. बाबा सिद्दिकी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे देखील काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये जाऊन राज्यसभा खासदार बनले आहेत. या धक्क्यांमधून काँग्रेस सावरत असताना मुंबईतील पक्षाचे नेते माजी खासदार संजय निरुपम हे देखील पक्षाची साथ सोडू शकतात, अशा चर्चा आहेत. संजय निरुपम हे काँग्रेस सोडून शिवसेना किंवा भाजपमध्ये जाऊ शकतात, अशा चर्चा आहेत.महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये मुंबई उत्तर पश्चिम या लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटलेला नाही. मविआचं जागा वाटप ज्या जागांमुळं रखडलं आहे त्यामध्ये मुंबई उत्तर पश्चिम जागेचा समावेश आहे. शिवसेना ठाकरे गटानं उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी समन्वयकांची नियुक्ती केलेली आहे. यामुळं ही जागा ठाकरेंकडे जाऊ शकते अशी शक्यता आहे. संजय निरुपम यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. सध्या या मतदारसंघात विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर आणि अमोल कीर्तिकर हे उमेदवार असू शकतात. रामदास कदम याचं देखील या मतदारसंघावर लक्ष होतं. काँग्रेसला हा मतदारसंघ न मिळाल्यास संजय निरुपम वेगळा निर्णय घेऊ शकतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत संजय निरुपम यांची चर्चा सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे.

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचं गणित
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेनेचे गजानन कीर्तिकर खासदार आहेत. कीर्तिकर सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. गजानन कीर्तिकर यांचा मुलगा अमोल कीर्तिकर शिवसेना ठाकरे गटात आहे. सध्यातरी या लोकसभा मतदारसंघात कीर्तिकर पितापुत्रांची लढत होऊ शकते, अशा चर्चा आहेत.संजय निरुपम यांनी वेगळा निर्णय घेत पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केल्यास गजानन कीर्तिकर यांच्यासमोर अडचणी निर्माण होऊ शकतात. संजय निरुपम की गजानन कीर्तिकर यांना उमेदवारी द्यायची हा पेच एकनाथ शिंदे यांच्या समोर उभा राहू शकतो.