• Thu. May 1st, 2025

एक मराठा लाख मराठा, काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांचं लक्षवेधी जॅकेट, विधिमंडळात चर्चेचा विषय

Byjantaadmin

Feb 20, 2024

मुंबई : मराठा आरक्षणाच्या ज्वलंत प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी आज राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत साधारणतः १० ते १२ टक्के स्वतंत्र आरक्षण देणारे विधेयक मंजूर केले जाणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र आणि काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांच्या वेशभूषेने यावेळी लक्ष वेधून घेतलं.’एक मराठा लाख मराठा, एकच मिशन मराठा आरक्षण’ असं डाव्या बाजूवर छपाई असलेलं खाकी रंगाचं जॅकेट धीरज देशमुख यांनी परिधान केलं होतं. तर एक मराठा लाख मराठा, मराठा आरक्षण असं लिहिलेली नेहरु टोपी धीरज देशमुख यांनी डोक्यात घातली होती. धीरज देशमुख यांचा हा हटके आणि ट्रेण्डी लूक विधिमंडळ परिसरात चर्चेचा विषय ठरला होता.

धीरज देशमुख काय म्हणाले?

आमची सरकारला मागणी आहे की मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील ज्या मुद्द्यांवर आंदोलन करत आहेत. ते सर्व मुद्दे आणि मराठा समाजाला सविस्तरपणे त्यांचं आरक्षण कसं मिळणार आहे, प्रत्येक वेळी सरकार आम्ही टिकणारं आरक्षण देणार असल्याचं सांगत आहे, परंतु विरोधीपक्ष म्हणून आम्हाला असं वाटतं की सरकार जनतेची फसवणूक करत आहे, ही फसवणूक थांबली पाहिजे. जो अध्यादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना दिल्यानंतर आंदोलन सुटलं होतं, तो घरी-गावाला जाईपर्यंत त्यांना परत आंदोलनाला बसावं लागलं, त्यावर सरकारने भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असं धीरज देशमुख माध्यमांशी बोलताना म्हणाले.काँग्रेसची भूमिका आहे की, ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला त्यांचं न्याय्य आरक्षण मिळालं पाहिजे. ज्यांना कुणबी दाखले मिळाले आहेत, त्यांच्या श्वेतपत्रिका सरकारने काढल्या पाहिजेत, की कुणाला मिळणार आहे, त्याचे फायदे कसे मिळणार आहेत, मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी काँग्रेस पक्ष त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे, अशी ग्वाही धीरज देशमुख यांनी दिली.

धीरज देशमुख कोण आहेत?

धीरज देशमुख हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे सर्वात धाकटे सुपुत्र आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते लातूर ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. ते माजी मंत्री अमित देशमुख आणि प्रख्यात अभिनेते रितेश देशमुख यांचे धाकटे बंधू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *