मुंबई : लोकसभा निवडणुकांअगोदर विरोधी पक्षातील नेते मंडळी सोबत घेऊन पक्ष बळकटीचा विचार भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाचा दिसून येतो. त्यादृष्टीने महाराष्ट्रातील काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण, बाबा सिद्धिकी, मिलिंद देवरा यांना मोदींच्या विकासाचा करिश्मा दिसला आणि त्यांची अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी पक्षात दोन गट पडलेले असताना, अजितदादा सोबत असतानाही शरद पवार यांच्या गटातील बडा नेता भाजपत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी आज सकाळपासून जोर धरला होता. या संपूर्ण चर्चेचा रोख हा जयंत पाटील यांच्यावर होता. याच संदर्भाने सोमवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याविषयीच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

मुंबईतील फॉर्टमधील बॅलार्ड इस्टेट येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. मी कुठेही जाणार नाही. मी कुणाला संपर्क केलेला नाही, त्यांनीही मला संपर्क केला नाही, अशा शब्दात त्यांनी आपल्या भाजप प्रवेशाच्या बातम्यांचं खंडन केलं. विरोधी पक्षात संभ्रम निर्माण करण्यासाठी अशा बातम्या पसरवल्या जात असल्याचंही ते म्हणाले.आमचा पक्ष फुटलाय. पक्षातून महत्वाचे लोक गेलेत. तरीही विचलित न होता आमचं काम सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आमचं काम सुरू आहे. पक्षातील तरुणांना साथीला घेऊन, त्यांना निवडणुकीत संधी देऊन आगामी काळात आमचा पक्ष भरारी घेईल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
जयंत पाटलांनी पत्रकारांनाच कामाला लावलं!
दर आठ दिवसांनी माध्यमांमध्ये मी इकडे जाणार-तिकडे जाणार अशी चर्चा चालू असते. हे का होतंय ते तुम्ही पत्रकारांनीच शोधून काढलं पाहिजे. माझं एवढं काम तुम्ही करा. अशा चर्चा कोण घडवून आणतंय हे तुम्हीच शोधून काढा, असं विनोदी शैलीत सांगत जयंत पाटलांनी पत्रकारांनाच कामाला लावलं.
तुम्हाला मंत्रिपद मिळणार असल्याचीही चर्चा, खरंय?
भाजपमध्ये गेल्यावर तुम्हाला मंत्रिपद मिळणार असल्याचीही चर्चा आहे, असा प्रश्न विचारल्यावर जयंत पाटील म्हणाले, मी गेली १७ ते १८ वर्षे राज्याच्या मंत्रिमंडळात काम केलं आहे. त्यामुळे मंत्रिपद हे एकमेव मोठं प्रलोभन असू शकत नाही.