मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने संभाव्य उमेदवारांसाठी चाचपणी सुरू केली आहे. त्यानुसार राज्यातील उमेदवारांची प्राथमिक यादी तयार करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेसच्या छाननी समितीची विशेष बैठक येत्या २२ फेब्रुवारी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री हे या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील उमेदवारांची चाचपणी पूर्ण करून ही यादी दिल्लीत निवडणूक समितीकडे दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे जागा वाटप सध्या अंतिम टप्प्यात असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसकडून काही दिवसांपूर्वीच मतदारसंघ निहाय समन्वयकांची आणि निरीक्षकांची यादी काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता. या समन्वयक आणि निरीक्षकांनी नुकताच अहवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सादर केला होता. या अहवालबाबत गेल्या अनेक बैठकीत चर्चा करण्यात आली असून त्यानंतर साधारणपणे इच्छुक मतदारसंघाची यादी तयार करण्यात आली होती. अखेर आता पक्षाने उमेदवारांची चाचपणी सुरू केली असल्याचे सांगण्यात येते.त्यानुसार राज्यातील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची प्राथमिक यादी निश्चित करण्यासाठी २२ फेब्रुवारी रोजी पक्षाच्या छाननी समितीची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा नाना पटोले यांच्यासह महाराष्ट्रातील इतर बडे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत उमेदवारांच्या नावाबाबत चर्चा केली जाणार असल्याचे कळते.

समितीत पृथ्वीराज चव्हाण
आगामी लोकसभा निवडणुकीकरिता महाराष्ट्र काँग्रेसतर्फे विविध समित्या जाहीर केल्या होत्या. या समितीमध्ये अशोक चव्हाण यांचा समावेश करण्यात आला होता. आता त्यांच्या ऐवजी पृथ्वीराज चव्हाण यांना या समितीत स्थान देण्याचा निर्णय लोणावळा येथील शिबीरात घेण्यात आला आहे.