• Thu. Aug 14th, 2025

आम्हाला विधानसभेचा शब्द द्या, मगच…; ठाकरेंच्या सूनेने अजितदादांच्या अडचणी वाढवल्या

Byjantaadmin

Feb 19, 2024

पुणे (इंदापूर) : बारामती आणि इंदापूर हे दोन तालुके एकमेकांना लागून आहेत. अजित पवार यांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवातही इंदापूर तालुक्यातील छत्रपती साखर कारखान्यापासून केली. परंतु त्यांनी राजकीय जीवनात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना सातत्याने अडचणीत आणले. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता आणि पुत्र राजवर्धन यांनी आता ”आधी आम्हाला विधानसभेचा शब्द द्या, मगच लोकसभेच्या मदतीचे बघू” असं आव्हान अजित पवार यांना दिलं आहे. त्यामुळे बारामती लोकसभेच्या जागेवरून आता अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील गटामध्ये कलगीतुरा रंगल्याचं चित्र आहे.हर्षवर्धन पाटील हे राज्यात अनेक वर्ष मंत्री राहिले. काँग्रेसचे मंत्री म्हणून त्यांचा नावलौकिक मिळवला. परंतु त्यांच्या राजकीय जीवनात अजित पवार यांनी त्यांची कोंडी करण्याची एकही संधी सोडली नाही. पाटील यांच्या निष्ठावंतांना फोडत इंदापूरात राष्ट्रवादीची ताकद निर्माण केली. जिल्हा परिषद, पंचायत समिती ते इंदापूर नगरपालिका या सगळ्या निवडणूकांमध्ये पाटील यांना जेरीस आणले. आमदार दत्तात्रय भरणे यांना ताकद दिली. भरणे यांना छत्रपतीचे अध्यक्षपद दिले. लगोलग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लाल दिवा दिला. दुसरीकडे पाटील यांचे महत्त्वाचे मोहरे गळाला लावत पुढे भरणे यांनाच आमदारकीला उतरवले. त्यातून पाटील यांची राजकीय कारकीर्द पुरती संपविण्याचा विडाच पवार यांनी उचलला होता.

बांधालगतच्या शेजाऱ्याला अजित पवार यांनी कायम डिवचले. हर्षवर्धन पाटील मंत्री असतानाही पुण्याचे पालकमंत्री पद स्वतःकडे ठेवत त्यांची कोंडी केली. पाटील यांच्या दोन्ही साखर कारखान्यांच्या बाबतीतही तेच घडले. या सगळ्या त्रासाला कंटाळून अखेर पाटील हे भाजपवासी झाले. त्यांनी भाजपचे काम सुरु केले. आता खुद्द पवार हेच महायुतीत सहभागी झाले आहेत. त्यामुळे त्यांना स्वतःच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी पाटील यांची मदत गरजेची बनली आहे. पाटील यांची कन्या व पुत्र मात्र मागील अनुभव विसरले नाहीत.

काका-पुतण्यांनी हर्षवर्धन यांची कायम कोंडी केली. एकीकडे लोकसभेला खासदारकीसाठी मदत मागायची. इप्सित साध्य झाले की अवघ्या सहा महिन्याने येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत मात्र काही तरी कारण काढत आपला उमेदवार द्यायचा. त्या माध्यमातून पाटील यांना धोबीपछाड देण्याचे काम आजवर घडत आले. मात्र, आता परिस्थिती पुरती बदलली आहे. हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता या भाजयुमोच्या जिल्हाध्यक्षा आहेत. गेल्या काही महिन्यात त्यांनी स्वतःचे राजकीय स्थान पक्के केले आहे. राजवर्धन हे इंदापूर तालुक्यात बस्तान बसवत आहेत. नुकतेच भाजपने हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्षपद देत त्यांचे पुनर्वसन केले आहे. पाटील यांना दिलेले पद म्हणजे त्यांना लोकसभा, विधानसभेला शांत करण्याचा प्रयत्न असू शकतो, अशी चर्चा त्यामुळे सुरु झाली. परंतु अंकिता व राजवर्धन यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत काहीही झाले तरी हर्षवर्धन पाटील हे विधानसभा लढवणार असल्याचे सांगितले आहे. शिवाय अजित पवार यांनी विधानसभेला मदतीचा शब्द दिला तरच लोकसभेला काम करू, असं आव्हानच दोघं भावा-बहिणींनी दिलं आहे.खुद्द हर्षवर्धन पाटील या विषयावर अद्याप बोललेले नाहीत. भाजपमध्ये पक्षादेश शिरसावंद्य मानला जातो. त्यामुळे त्यांनी या विषयावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु त्यांच्या कुटुंबाने दिलेल्या आव्हानामुळे अजित पवारांपुढे अडचण निर्माण झाली आहे. इंदापूरात सध्या राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे हे आमदार आहेत. त्यामुळे स्वतःच्या वाट्याची जागा अजित पवार भाजपला देतील अशी सुतराम शक्यता नाही. दुसरीकडे पाटील यांच्या कुटुंबाने ते उभे राहणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीतून महायुतीचे नेते कशी वाट काढतात, याकडे लक्ष लागले आहे. परंतु सध्या तरी या आव्हानामुळे अजित पवारांचे टेन्शन वाढलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *