ठाणेः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या होमग्राऊंडवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी रणशिंग फुंकलं आहे. निवडणुका, फोडाफोडी, आरोप-प्रत्यारोप या सगळ्याच मुद्द्यांवरुन आदित्यंनी मुख्यमंत्री आणि राज्य सरकारला धारेवर धरलं.आदित्य ठाकरे म्हणाले की, हेच ठाणं पुन्हा एकदा शिवसेनेला जिंकून दिल्याशिवाय राहणार नाही. कारण गद्दार निघून गेलेले असले तरी मतदार आमच्यासोबत आहेत. पूर्वी नगरविकास खात्यासाठी एकनाथ शिंदे हे ‘मातोश्री’वर येऊन रडले होते, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.

”सध्याचे मुख्यमंत्री म्हणतात, आम्हाला शेतीतलं काय कळतं? आदित्य आत्ता जन्माला आला त्याला शेतीमधलं काय माहिती? पण त्यांची रात्रीची शेती आम्हाला कळालेली नाही. रात्रीच्या शेतीत मुख्यमंत्री नेमकं काय पिकवतात? त्यांच्या गावात जायला साधा रस्ता नाही म्हणून ते दोन हेलिकॉप्टर घेऊन जातात आणि शेतात उतरतात. मागच्या काही वर्षात गावात त्यांच्या जागा किती वाढल्या, बंगले किती वाढले हेही महत्त्वाचं आहे.” असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला.विद्यमान सरकारने राज्यात एकही नवीन उद्योग आणलेला नाही. केवळ दुसऱ्याचे पक्ष फोडण्याचं काम जोरात सुरुय. ज्यांना आम्ही एवढं सगळं दिलं त्यांनी निर्लज्जपणे पक्ष फोडला. तेही चांगलं काम करत नाहीत. जर तुमची हिंमत असेल तर राजीनामा द्या, मी तुमच्या मतदारसंघात येऊन लढतो, असं आव्हान आदित्य ठाकरेंनी दिलं.सध्या एक टीम पक्ष फोडतेय, एक टीम कुटुंब फोडतेय.. असं म्हणत आदित्य ठाकरेंनी विद्यमान महायुतीच्या सरकारला धारेवर धरलं. ठाण्यामधून त्यांनी रणशिंग फुंकलं असून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान दिलं आहे. यापूर्वीही त्यांनी वरळीमधून लढण्याचं आव्हान एकनाथ शिंदेंना दिलं होतं.