आगामी लोकसभा निवडणूकीत विजय मिळवण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. यादरम्यान भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ पुन्हा वाढवण्यात आला आहे. आता ते जून २०२४ पर्यंत पक्षाच्या अध्यक्षपदी राहतील.भाजपच्या अधिवेशनात या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून आता २०२४ ची लोकसभा निवडणूक जिंकण्याची जबाबदारी नड्डा यांच्या खांद्यावर असणार आहे. गेल्या वर्षीही पक्षाने त्यांच्या अध्यक्षपदावर विश्वास व्यक्त केला होता, आता पुन्हा एकदा त्यांना संधी देण्यात आली आहे.

जेपी नड्डा यांच्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या अध्यक्षतेखाली भाजपने अनेक राज्यांमध्ये पुन्हा आपले सरकार स्थापन केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशमधून जो विजय मिळवला त्याचे श्रेय जेपी नड्डा यांना देण्यात येते. अशा तऱ्हेने आगामी लोकसभा निवडणूकीत देखील ४०० जागांचा टप्पा ओलांडण्याची तयारीही त्यांच्या अध्यक्षतेखाली एनडीएकडून केली जात आहे.गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अधिवेशनाला संबोधित केले. यावेली दोन्ही नेत्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला, पुढील रणनीतीवर सविस्तर चर्चा केली आणि तिसऱ्या टर्मबाबत विश्वास व्यक्त केला.
भाजप अधिवेशनादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की, विरोधी पक्षांना योजना कशा पूर्ण कराव्यात हे माहित नसेल परंतु खोटी आश्वासने देण्यात पटाईत आहे. आमचे वचन विकसित भारताचे आहे. हे लोक भारताला विकसित करू शकत नाहीत, हे या लोकांनी मान्य केले आहे, भाजप हा एकमेव पक्ष आहे ज्याने हे स्वप्न पाहिले आहे… तिसऱ्या टर्ममध्ये भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनवण्याचा संकल्प आम्ही केला आहे आणि ही मोदींची गॅरंटी आहे.यासोबत गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, इंडिया आघाडी आणि काँग्रेस पक्ष हे देशातील लोकशाही संपवत आहेत. त्यांनी देशातील लोकशाहील भ्रष्टाचार, परिवारवाद आणि जातीवादाचे रंग दिले आहेत. परिवारवादी पक्ष या माध्यमातून अशी लोकशाही व्यवस्था उभी करत आहेत ज्यामधून जनमत कधीच स्वतंत्रपणे वर येऊ नये. पंतप्रधान मोदीनी दहा वर्षात भ्रष्टाचार, परिवारवाद, तुष्टिकरण आणि जातीवाद संपवून विकास केला आहे.