आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या ‘ माझा कला प्रवास ‘ या फोटोबुकचे सोनाली कुलकर्णीच्या हस्ते प्रकाशन
लातूर : आवाजाचा बादशहा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असणारे लातूरचे ख्यातनाम कलाकार व चित्रकार रत्नाकर औसेकर यांच्या जीवनावरील ‘ माझा कला प्रवास ‘ या फोटोबुकचे प्रकाशन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व लातूरच्या जिल्हाधिकारी सौ. वर्षा ठाकूर- घुगे यांच्या हस्ते करण्यात आले.

या पुस्तक प्रकाशन प्रसंगी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, ज्येष्ठ नटवर्य शैलेश गोजमगुंडे, ज्येष्ठ पत्रकार विलास बडे, प्रदीप पाटील खंडापूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. फोटोबुकचा हा प्रकाशन सोहळा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या व्यासपीठावर संपन्न झाला. या फोटोबुकमध्ये रत्नाकर औसेकर यांच्या प्रखर संघर्षमय जीवनातून एक कलाकार कसा घडू शकतो याचे सत्य फोटो दर्शन यामध्ये होते. या फोटबुकवरच रत्नाकर औसेकर आता प्रत्यक्ष रंगमंचावर ‘ माझा कला प्रवास ‘ नावाचा एकपात्री दिड तासाचा प्रयोग खास शाळा, कॉलेज, संस्था, क्लबच्या माध्यमातून सादर करणार आहेत. हा कार्यक्रम संपूर्णपणे विनामूल्य असून यामागील उद्देश्य फक्त कलाकारांची नवीन पिढी तयार करणे हाच आहे. तरी संबंधितांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन रत्नाकर औसेकर यांनी केले आहे.