• Thu. May 1st, 2025

शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांनी नवतंत्रज्ञानाचा अवलंब करावा- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

Byjantaadmin

Feb 17, 2024

शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांनी नवतंत्रज्ञानाचा अवलंब करावा

– जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

·         जागतिक कडधान्य दिनानिमित्त शेतकरी परिसंवादाचे आयोजन

लातूर, (जिमाका) : शेतकऱ्यांनी नवतंत्रज्ञानाच्या आधारे शेतीतील उत्पादन खर्च कमी करून गुणवत्तापूर्ण उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतीतून उत्पन्नाचा शाश्वत स्त्रोत निर्माण होईल. यासोबतच शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्वतःच्या शेतमालाची ब्रॅण्डिंग, मार्केटिंग स्वतः करण्यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.शाश्वत शेती उपक्रमाअंतर्गत एडीएम अॅग्रो इंडस्ट्रीज इंडिया प्रा. लि, विकास अॅग्रो फार्मर प्रा. कंपनी लि. आणि लातूर कृषि महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नागझरी येथे जागतिक कडधान्य दिनानिमित्त आयोजित ‘शेतकरी परिसंवाद’ कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या.

माजी कृषी सहसंचालक डॉ. दिनकर जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवसांब लाडके, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, प्रा. डॉ. अरुण गुट्टे व प्रा.डॉ. वसंत सूर्यवंशी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

लातूर हा देशातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक जिल्हा असून तूर आणि हरभरा या कडधान्यांचे दर निश्चित करण्यासाठी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा फार मोठा वाटा आहे. शेतीतील महिलांचा टक्का वाढविण्यासाठी सातबाऱ्यावर महिलांचे नावे येणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी नमूद केले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विविध क्षेत्रात प्रगतीचे टप्पे गाठले आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी प्रगती साधली आहे. यामध्ये आणखी खूप काम करण्यास वाव असल्याचे त्यांनी सांगितले.कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी शाश्वत शेतीच्या विकासामध्ये पशुधनाचे महत्व विशद केले. पारंपारीक शेतीला नवतंत्रज्ञानाची जोड देऊन शेतकऱ्यांनी आत्मनिर्भर होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. लाडके यांनी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी कृषि विभाग कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

प्रमुख मार्गदर्शक प्रा. अरुण गुट्टे व प्रा. डॉ. वसंत सूर्यवंशी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना तूर व हरभरा या कडधान्य पिकाचे महत्त्व, पीक फेरपालट व तूर, हरभरा या पिकांवर येणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंचसूत्रीचा अवलंब करून आपल्या उत्पादनात वाढ करण्याबाबत मार्गदर्शन केले. एडीएम अॅग्रोचे वाणिज्य विभाग प्रमुख एम.बी.गाजरे यांनी एडीएम कडून सोयाबीन सोबतच तूर आणि हरभरा या पिकांच्या मूल्यसाखळी संवर्धनासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले.अध्यक्षीय समारोपात डॉ. दिनकर जाधव म्हणाले, लातूरची तूर ही ओळख कायम ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. येणाऱ्या काळात सोयाबीनचे क्षेत्र वाढून त्याची मोठी बाजारपेठ विकसित होईल. यामध्ये शेतकऱ्यांनी टिकून राहण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करताना अधिक उत्पादनक्षम वाणांचा प्रचार व प्रसार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी प्रगतशील शेतकरी प्रकाश झुंजे पाटील, श्रीराम साळुंखे, डॉ. विजय भामरे, दिलीप राऊत, अनंत गायकवाड, विकास फार्मर प्रो. कंपनी चे संचालक विलास उफाडे तसेच एडीएमचे अमोल ढवण, अंजली रितू, राम सिनगारे, गोपाळ तळेकर, एडीएम आणि विकास अॅग्रोचे सहकारी वृंद व नागझरी, हरंगुळ, टाकळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयानंद माने यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *