सातारा : काही जण असे असतात, जे परिस्थिती कितीही हलाखाची असली, तरी त्यावर मात करतात. आज अशाच व्यक्तीची कहाणी आपण जाणून घेणार आहोत, ज्यांनी तब्बल 30 वर्षे फुटपाथवर फळेविक्री केली आणि आज त्यांनी तब्बल 50 लाख रुपयांचा बंगला बांधला आहे. धोंडीराम हांडे असे या व्यक्तीचे नाव आहे.

घरची परिस्थिती हालाखीची मात्र, मनात कष्टाची तयारी आणि स्वतःवर असलेला विश्वास घेऊन लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कलांडी गावातील धोंडीराम हांडे हे सातारा जिल्ह्यात कामाच्या शोधात आले. धोंडीराम हांडे यांनी दहावीचे शिक्षण पूर्ण झाले आणि घरची परिस्थिती साधारण असल्याने 1984 मध्ये सातारा शहरात धाव घेतली. दहावीचे शिक्षण झालेले धोंडीराम यांनी 300 रुपये पगारावर फळाच्या दुकानात कामाला सुरुवात केली. यानंतर एक ते दीड वर्ष फळाच्या दुकानांमध्ये काम केले.यानंतर फळ व्यवसायाची संपूर्ण माहिती आणि अभ्यास केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. फळ विक्री करत असताना व्यवसायामध्ये चढ-उतार होत होता. दिवसाला त्यांना 50 ते 100 रुपये फळ व्यवसाय मधून मिळू लागले आणि त्यांचा व्यवसाय सुरू झाला. व्यवसायामध्ये अनेक अडचणींवर त्यांनी मात केली. खिशात मोठे भांडवल नव्हते. पण फळ व्यवसायाचा अभ्यास दांडगा असल्याने त्यांनी हार मानली नाही.
मार्केटमध्ये ओळख वाढवून आर्थिक व्यवहार, संबंध फळविक्रेत्यांनी ठेवलेला विश्वास याला तडा जाऊन दिला नाही. कोणत्याही व्यापाऱ्याचे पैसे त्यांनी बुडवले नसल्याचे देखील धोंडीराम हांडे यांनी सांगितले. कठीण काळामध्ये आपल्या पत्नीने मोलाची साथ दिली. त्यांची दोन मुले, आणि त्यांचे भाऊ यांचे शिक्षणही त्यांनी याच फूटपाथवरच्या फळ विक्रीमधून केले, असे त्यांनी सांगितले.आज त्यांचा भाऊ शिक्षक झाला. तसेच मोठा मुलगा पुणे येथे मोठ्या कंपनीमध्ये नोकरी करतो आहे तर लहान मुलगा स्वतः व्यवसाय करतो आहे. मागील 30 वर्षापासून फळ विक्री व्यवसाय करत माझे सर्व आयुष्य हे फुटपाथवर गेले आहे. या फुटपाथमुळे मी माझ्या स्वप्नातला स्वर्ग म्हणजे माझे घर बांधू शकलो. माझ्या मुलांना, भावांना, चांगले शिक्षण देऊ शकलो आहे, बोलताना ते म्हणाले.