बारामतीत अजित पवार गटाचा बुथ कमिटी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीचे संकेत दिले. बारामतीत उमेदवार कोण असणार? हे त्यांनी स्पष्ट केले. बारामतीमध्ये तुमच्यासमोर चार-पाच वेळा MP असणारा उमेदवार असणार आहे. आपला उमेदवार नवखा असणार आहे. पहिल्यांदा खासदार होणार असणार आहे. पण निवडून गेलेल्या खासदारापेक्षा जास्त काम करणार असणार आहे. हा अजित पवार यांचा शब्द आहे, असे सांगत अजित पवार यांनी प्रथमच खासदारकीला उभा राहणारा उमेदवार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे बारामतीमधून सुनेत्रा पवार उमेदवार असणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.

सुनेत्रा पवार यांची जोरात तयारी
बारामती लोकसभा मतदार संघात सुनेत्रा लोकसभेसाठी खासदारकी लढवणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. केवळ यासंदर्भात अधिकृत घोषणा बाकी आहे. आता बारामती परिसरात सुनेत्रा पवार यांच्या माहिती व कार्याचा आढावा घेणारा प्रचार रथ फिरू लागला आहे. त्यासाठी गाडीवर फ्लॅक्स लावले आहे. आज बारामती बुथ मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी पुन्हा नवखा उमेदवार असणार असल्याचे वक्तव्य केले.
आता निवडणूक महत्वाची
आता निवडणूक महत्त्वाची आहे. पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरायचे आहे. त्यासाठी बुथ कमिटीचे काम महत्त्वाचे आहे. हे काम ज्यांना जमणार नाही, त्यांनी सांगावे. शेवटी सगळ्यांना विचार स्वतंत्र आहे. आता जागरूकतेने काम करावे लागणार आहे. डोळ्यात तेल घालून काम करायचे आहे. आपला जो उमेदवार अधिकृत असेल त्याला बळ दिले पाहिजे. मनात संभ्रम ठेवू नका.