• Thu. May 1st, 2025

माधव भंडारी यांच्या मुलाची भावूक पोस्ट; ’50 वर्षे पक्षाचं काम पण 12 वेळा अपेक्षाभंग…’

Byjantaadmin

Feb 16, 2024

RAJYASABHA महाराष्ट्रात सहा जागांसाठी सात अर्ज दाखल झाले होते. भाजपने अशोक चव्हाण, अजित गोपछडे, मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यासोबतच चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. दरम्यान, भाजपने उमेदवारांसाठी अनेक नावांची चर्चा केली होती. यामध्ये विनोद तावडे, पंकजा मुंडे, माधव भंडारी आणि हर्षवर्धन पाटील यांचा समावेश होता. यावेळीही भाजपकडून माधव भंडारी यांच्या नावाची चर्चा होती, मात्र त्यांना तिकीट दिले नाही. त्यामुळे माधव भंडारी यांचा मुलगा चिन्मय भंडारी निराश होत त्याने एक ट्वीट केलं यामध्ये त्यांना असं म्हटलं की, १२ वेळा वडिलांचं नाव चर्चेत पण उमेदवारी नाही. १२ वेळा चर्चा आणि १२ वेळा अपेक्षाभंग….तर या भावनिक पोस्टवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलंय. माधव भंडारी आमचे नेते आहेत तर त्यांना योग्य वेळी सगळं मिळेल असे ते म्हणाले.

काय आहे पोस्टमध्ये?

चिन्मय भांडारी यांनी या पोस्टमध्ये त्यांचे वडिल अर्थात माधव भांडारी यांच्या आजपर्यंतच्या राजकीय प्रवासाविषयी आणि त्यांनी पक्षासाठी केलेल्या संघर्षाविषयी सांगितलं आहे. त्याचबरोबर माधव भांडारी यांनी आयुष्यभर पाळलेल्या तत्वांविषयीही त्यांनी नमूद केलं आहे. मात्र, यानंतर त्यांनी पक्षाकडून माधव भांडारींना जे अपेक्षित फळ मिळायला हवं होतं, ते मिळालं नसल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. माधव भांडारींचं नाव आजपर्यंत १२ वेळा विधानसभा किंवा विधानपरिषद उमेदवारीसाठी चर्चेत आलं, पण बाराही वेळा त्यांना तिकीट मिळालं नसल्याची खंत या पोस्टमध्ये मांडण्यात आली आहे.

“माझ्या वडिलांनी १९७५ साली जनसंघ किंवा जनता पक्षात प्रवेश केला. आता त्या गोष्टीला ५० वर्षं उलटली आहेत. त्यानंतर फक्त पाच वर्षांत, म्हणजे १९८० साली जनसंघाचं रुपांतर भारतीय जनता पक्षात झालं. माझ्या वडिलांना अनेकजण भाजपाचे एक आक्रमक प्रवक्ते म्हणून ओळखतात. पण ते याहून खूप काही आहेत आणि त्यांनी याहून खूप काही केलं आहे”, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“दुर्दैवाने त्यांना केलेल्या कामाचं अत्यंत कमी फळ मिळालं”

“पक्षासाठी, जनतेसाठी काम करत असताना ते प्रसिद्धीच्या वलयापासून लांब राहिले. त्यांनी कधीच त्यांच्या पदाचा वैयक्तिक लाभासाठी गैरवापर केला नाही. पण दुर्दैवाने त्यांना कायमच केलेल्या कामाचं अत्यंत कमी फळ मिळालं”, असा मुद्दा या पोस्टमध्ये उपस्थित करण्यात आला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *