• Thu. Aug 14th, 2025

सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या स्वरवर्षावात लातूरकर चिंब !

Byjantaadmin

Feb 16, 2024

महासंस्कृती महोत्सवाचा समारोपीय सोहळा झाला संस्मरणीय

सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या स्वरवर्षावात लातूरकर चिंब !

·         प्रत्येक गीताला रसिकजणांची टाळ्यांच्या गजरात दाद

·         भक्तीगीतात तल्लीन होत प्रेक्षकांचाही सुरात सूर

लातूर, (जिमाका): राज्य शासनाचा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित महासंस्कृती महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम आज दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावरील कै. नटवर्य श्रीराम गोजमगुंडे रंगपीठ येथे पार पडला. सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या ‘सूर निरागस हो…’ या कार्यक्रमाने महोत्सवाचा समारोप झाला. यावेळी त्यांनी सादर केलेल्या एकाहून एक सरस आणि अवीट गीतांच्या स्वरधारांमध्ये लातूरकर चिंब भिजून गेले. यावेळी सादर झालेल्या बहारदार गीतांमुळे आणि त्याला मिळालेल्या तितक्याच दमदार प्रतिसादामुळे समारोपीय सोहळा संस्मरणीय ठरला.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाचा महासंस्कृती महोत्सव आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने आयोजित विभागीय 100 वे नाट्य संमेलनाच्या निमित्ताने लातूर जिल्ह्यातील रसिकांना पाच दिवसाची सांस्कृतिक मेजवानी मिळाली. यानिमित्ताने विविध दर्जेदार कार्यक्रम लातूरकरांना पाहायला मिळाले. या उपक्रमाचा समारोपही तितकाच दर्जेदार आणि संस्मरणीय झाला.

महेश काळे यांचे स्वर कानात साठविण्यासाठी मोठ्या संख्येने जमलेल्या लातूरकरांसाठी आजचा दिवस पर्वणी ठरला. शास्त्रीय संगीतातील जवळपास 18 राग एकत्र गुंफलेल्या रागमालेने महेश काळे यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. शास्त्रीय गायन, भक्तिगीते, नाट्यगीतांच्या माध्यमातून रंगलेल्या या स्वर मैफिलीमध्ये प्रेक्षकही तल्लीन होवून गेले. या प्रेक्षकांनाही आपल्या गायनात सहभागी करून घेत महेश काळे यांनी संपूर्ण वातावरण संगीतमय केले.

सूर निरागस हो…, घेई छंद मकरंद…, हे सुरांनो, चंद्र व्हा चांदण्याचे कोष माझ्या प्रियकराला पोचवा… यासारखी एकाहून एक श्रवणीय गीते सादर करणाऱ्या महेश काळे यांच्या प्रत्येक गीताला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. ‘मोरया…मोरया…’ या गाण्यामध्ये प्रेक्षकांना सहभागी करून घेत महेश काळे यांनी सर्वांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. महेश काळेंच्या सुरात सूर मिसळत प्रेक्षकांनीही या कार्यक्रमांची रंगत वाढविली. कार्यक्रमाच्या शेवटी सादर झालेल्या ‘कानडा राजा पंढरीचा…’ या अभंगाप्रसंगी उपस्थितांनी टाळ्याच्या गजरात विठू नामाचा गजर करीत कार्यक्रमाचा समारोप केला.

पाच दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमांना लातूरकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल जिल्हा प्रशासनाच्यावतीने उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने शैलेश गोजमगुंडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *