• Fri. May 2nd, 2025

बाभळगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या १९ व्या सत्राचे दीक्षांत संचलन उत्साहात

Byjantaadmin

Feb 16, 2024

बाभळगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या १९ व्या सत्राचे दीक्षांत संचलन उत्साहात

▪️लातूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायंधीश व्ही. व्ही. पाटील यांची उपस्थिती

▪️उत्कृष्ट प्रशिक्षणार्थींचा सन्मानचिन्ह, चषक देवून सन्मान

▪️चित्तथरारक प्रात्यक्षिके, लेझीम आणि आदिवासी नृत्याचे सादरीकरण

लातूर, दि. १६ (जिमाका) : बाभळगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचा १९ वा दीक्षांत संचालन सोहळा गुरुवारी उत्साहात पार पडला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांची यावेळी उपस्थिती होती. प्रशिक्षण काळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना यावेळी चषक, सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.

पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य तथा अपर जिल्हा पोलीस अधीक्षक अजय देवरे, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सहायक आयुक्त श्री. वाघचौरे, प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी नवदीप अग्रवाल यावेळी उपस्थित होते. 

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. पाटील यांनी प्रारंभी परेड निरीक्षण केले. त्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थींना पोलीस प्राचार्य अजय देवरे यांनी कर्तव्य आणि जबाबदारीबाबत शपथ दिली.

गुन्ह्याचा तपास करताना कायद्याचा अभ्यास हवा – श्री. पाटील

प्रशिक्षण पूर्ण झालेल्या पोलीस जवानांना प्रत्यक्ष कर्तव्य बाजविताना आपल्या प्रशिक्षण कालावधीत आत्मसात कौशल्याचा, शिकलेल्या कायद्यांचा उपयोग होतो. सध्या गुन्ह्यांचे स्वरूप बदलत असून त्याअनुषंगाने नवीन कायदेही तयार होत आहेत. कोणत्याही गुन्ह्याचा तपास करताना त्यासंबंधी असलेल्या कायद्याचा अभ्यास असल्यास तपासात त्रुटी राहत नाहीत. त्यामुळे प्रशिक्षणार्थी पोलीस जवानांनी प्रत्यक्ष कर्तव्य बजावताना वेळोवेळी नवीन येणाऱ्या कायद्यांचा अभ्यास करावा, असे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी सांगितले.

प्रशिक्षण केंद्रातून आदर्श, संवेदनशील पोलीस घडविण्याचा प्रयत्न – अजय देवरे

बाभळगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र २००६ पासून कार्यान्वित करण्यात आले असून आतापर्यंत १८ सत्रांमध्ये ८ हजार ३४० प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच १९ व्या सत्रात नवी मुंबई, मिरा भाईंदर, नागपूर आणि पिंपरी चिंचवड येथील ९०९ पोलीस जवानांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून आदर्श आणि संवेदनशील पोलीस घडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अजय देवरे यांनी प्रशिक्षण केंद्राचा अहवाल सादर करताना सांगितले.

उत्कृष प्रशिक्षणार्थींचा गौरव

पोलीस प्रशिक्षण वर्गात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींचा सन्मान यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. गोळीबार, बाह्य वर्गामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल साहेबराव बाळासाहेब गाढवे (नवी मुंबई), बाह्यवर्गात द्वितीय क्रमांकासाठी प्रकाश हेतराम उईके (नागपूर), आंतरवर्ग प्रथम योगेश बाळू कदम (मिरा भाईंदर), आंतरवर्ग द्वितीय भीमराव आप्पासाहेब घोरपडे (मिरा भाईंदर), कमांडो वर्ग प्रथम रमेश रामलाल मडावी (मिरा भाईंदर) यांचा चषक देवून सन्मान करण्यात आला. तसेच सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून साहेबराव बाळासाहेब गाढवे यांना गौरविण्यात आले.

पोलीस प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींनी यावेळी आदिवासी नृत्य, लेझीम नृत्य सादर केले. तसेच लातूर पोलीस दलाच्या जवानांनी कमांडो प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांना आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडविले. प्रशिक्षणार्थी पोलीस जवानांनी परेड निष्क्रमण संचलन करीत प्रशिक्षण केंद्राचा निरोप घेतला. पोलीस प्रशिक्षण केंद्राचे उप प्राचार्य पोलीस निरीक्षक व्ही. बी. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *