आयएमएच्या मिशन पिंक हेल्थच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन
लातूर : इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात आयएमएच्या मिशन पिंक हेल्थच्या माध्यमातून विद्यालयीन तसेच महाविद्यालयीन मुलींसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबिरांचा उपक्रम मिशन पिंक हेल्थच्या अध्यक्षा डॉ. सौ.वृंदा कुलकर्णी व त्यांच्या सहकारी तज्ज्ञ महिला डॉक्टर्सच्या कुशल नेतृत्वाखाली अत्यंत यशस्वीरीत्या राबविण्यात आला.

मकर संक्रमणाच्या काळात महिला वेगवेगळ्या प्रकारचे वाण लुटतात. परंतु मिशन पिंक हेल्थच्या महिला डॉक्टर्सनी कर्तव्यभावनेने विद्यालयीन तसेच महाविद्यालयीन किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शनाच उपक्रम अत्यंत व्यवस्थितरीत्या राबविला. मिशन पिंक हेल्थच्या अध्यक्षा डॉ. सौ.वृंदा कुलकर्णी यांनी यासंदर्भात विस्तृत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, विवेकानंद विद्यालय (गंगापूर), जवाहर नवोदय शाळा, सरस्वतीदेवी आश्रमशाळा (चिंचोलीराव वाडी), जिजामाता कन्या शाळा व दयानंद कनिष्ठ वाणिज्य विद्यालय या सर्व संस्थांमधील जवळपास १४०० किशोरवयीन विद्यार्थिनी व विद्यार्थी तसेच ३५० माता पालकांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले. मासिक पाळी, त्यातील समस्या,मासिक पाळीत घ्यावयाची स्वच्छता, रक्तक्षय(एनिमिया)व योग्य आहार,समाजमाध्यमे व त्याचे दुष्परिणाम, चांगला व वाईट स्पर्श यातील फरक याबाबत मुलींना, महिलांना सविस्तर माहिती देण्यात आली. त्यांच्या विविध शंकांचे व समस्यांचे निरसनही करण्यात आले.
या अभिनव उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्षा डॉ.वृंदा कुलकर्णी , सेक्रेटरी डॉ. रचना जाजू,डॉ. सुरेखा काळे, डॉ.अमृता पाटील, डॉ. कल्पना किनीकर, डॉ. सगीर पठाण या स्त्रीरोग तज्ञांनी हे मार्गदर्शन केले. कार्यक्रम आयोजित करण्यात डॉ.वृंदा कुलकर्णी, डॉ. सुरेखा काळे,डॉ. कल्पना किनीकर, डॉ. स्नेहल देशमुख यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी लातूर आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल राठी, सचिव डॉ. चेपूरे तसेच संपूर्ण आयएमए परिवाराचे सहकार्य लाभले.