मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणास बसले आहेत. सरकारने काढलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे अशी त्यांची मागणी आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळली आहे. मात्र, त्यांनी उपचार घेण्यास नकार दिलाय. अंतरवाली सराटी येथे जमलेल्या महिलांनी त्यांनी उपचार घ्यावे आणि सरकारने जरांगे यांच्या मागण्यांचा विचार करावा अशी मागणी केलीय. तर, मुंबई हायकोर्टानेही मनोज जरांगे पाटील यांना वैद्यकीय उपचार घेण्यास अडचण काय? असा थेट सवाल केलाय. जरांगे पाटील यांना औषधोपचार घ्यायला सांगा, फक्त सलाईन लावणं म्हणजे उपचार घेणं होत नाही, अशा सूचना हायकोर्टाने दिलंय आहेत. अशातच आता मनोज जरांगे पाटील यांच्या मुलीनेही सरकारला इशारा दिलाय.

मनोज जरांगे पाटील यांनी माझे काही बर वाईट झालं तर समाजाने पाठीशी थांबावे आणि सरकारला सळो की पळो करून सोडावं असे आवाहन केलंय. त्यांच्या आवाहनानंतर जरांगे पाटील यांच्या कुटुंबियांच्या भावनांचा बांध कोसळला. जरांगे पाटील यांच्या मुलीने तर सरकारवर जळजळीत टीका केलीय.
‘हे सगळं जे काही घडतंय ते नालायक सरकारमुळे घडत आहे. सरकारने येऊन त्यांचं उपोषण सोडवावं. मला खूप भीती वाटत आहे. पप्पांना काही झालं तर त्याला ट्रिपल इंजिन सरकार जबाबदार राहिल. पप्पांना काही झालं तर या सरकारच राजकिय करिअर उध्वस्त होईल असा इशाराच जरांगे पाटील यांच्या मुलीने दिलाय.
पप्पांना जर काही झालं तर हे सरकार राहणार नाही असे सांगून ती पुढे म्हणाली, ‘मी पप्पांना सांगितलं होतं उपोषण करू नका. पण, समाजाच्या वेदना मोठ्या आहेत त्यामुळे पप्पांना उपोषण करावं लागलं. माझ्या पप्पांना काही झालं तर समाज उभा जाळील. एक मुलगी बापासाठी काहीही करू शकते. जर, आरक्षण नाही दिलं तर एक मुलगी काय करू शकते हे दिसेल, असा इशाराही तिने दिलाय. पप्पांवर उपचार करण्यासाठी आमची परवानगी आहे. कारण, पप्पा बरे झाले तर आणखी लढू शकतील असेही ती म्हणाली.
मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीने प्रतिक्रिया देताना ‘नवऱ्यापेक्षा बायकोला काहीही महत्वाचे नसते. पण, आम्हाला आरक्षणही महत्वाचे आहे. त्यांना सहकारी रुग्णालयात घेऊन जाणार असतील तर आमची परवानगी आहे. सरकारच्या मंत्र्यांनी सहा दिवस तरी उपोषण करून दाखवावे. हे सरकारमधले मेलेले बरे. माझ्या नवऱ्याला काही झालं तर हे सरकार मधले मेलेले बरे. विजयाचा गुलाल उधळायला लावून सरकारने नुसता अपमान केला आहे, अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली.