• Fri. May 2nd, 2025

राष्ट्रवादी अजितदादांचीच, शरद पवार यांना मोठा धक्का; विधानसभा अध्यक्षांचा निकाल

Byjantaadmin

Feb 15, 2024

NCP आमदार अपात्रतेवर निर्णय देण्यास सुरुवात झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकालाचं वाचन करत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रवादी पक्ष कुणाचा हे स्पष्ट होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच विधानसभा अध्यक्षांनी मोठं विधान केलं आहे. आमदारांच्या संख्याबळावरच पक्ष कुणाचा यावर निर्णय देणार असल्याचं राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच शरद पवार हे कधीपर्यंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते? तसेच राष्ट्रवादीत कधी दोन गट पडले? यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भाष्य केलं आहे. तसेच राष्ट्रवादी हा पक्ष अजितदादा यांचाच असल्याचा ऐतिहासिक निकालही राहुल नार्वेकर यांनी दिला आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल वाचण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी काही गोष्टींवर भाष्य केलं. या पक्षात कुठलीही फूट पडलेली नाही. मात्र राष्ट्रवादीत दोन गट तयार झालेले आहेत. प्राथमिक स्तरावर मी पक्षीय रचना, घटना व विधीमंडळ बळ या त्रिसूत्री वर मत नोंदवत आहे, असं सांगतानाच जून 2023 पर्यंत शरद पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते. त्यापूर्वी त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी राजीनामाही मागे घेतला होता, असं राहुल नार्वेकर यांननी म्हटलं आहे. अजित पवार गट मूळ राजकीय पक्ष आहे. संख्याबळाच्या आणि पक्षीय संरचनेच्या दृष्टीने अजितदादा यांचा पक्षच मूळ राष्ट्रवादी असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे.

दोन्ही गटाचा पक्षावर दावा

खरी राष्ट्रवादी कुणाची? हा प्रश्न आहे. दोन्ही गटाकडून पक्षावर दावा करण्यात आला पक्ष कुणाचा हे पक्षाचे संविधान, विधिमंडळातील संख्याबळ यावर ठरवले जाते. त्यानुसारच आजचा निकाल दिला जाणार आहे, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

घटनेबाबत वाद नाही

राष्ट्रवादी काँग्रेसची घटना सर्वात महत्त्वाची आहे. दोन्ही गट त्याला बांधिल आहेत. राष्ट्रवादीच्या घटनेबाबत काहीच वाद नाही. 30 जून 2023 ला या पक्षात फूट पडली. अशावेळी नेतृत्त्वाबाबत पक्षाची घटना काय सांगते हे महत्त्वाचं आहे. अध्यक्ष, वर्किंग कमिटी आणि नॅशनल कमिटी ही पक्षाची निर्णायक पद्धत दर्शवते, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. तसेच शरद पवार गटाने प्रतिनिधी निवडल्याचे कोणतेच पुरावे दिले नाहीत, असंही नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

त्यांना मान्यता नाही

शिवसेना संदर्भात मी दिलेल्या निकालाचा दाखला याठिकाणी द्यावा लागेल. राष्ट्रवादी पक्षात अध्यक्ष पदावर दोघांकडून दावा केला जात आहे. दोन्ही गटांकडून पक्षाच्या घटनेप्रमाणे अध्यक्ष निवड झाली नसल्याचा दावा केला जात आहे. दोन समांतर नेतृत्व याठिकाणी उभे राहिले आहेत. तसेच दोन्ही गटांकडून अपात्रता याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. एनसीपी वर्किंग कमिटी ही पक्षाच्या घटनेप्रमाणे सर्वोच्च यंत्रणा आहे. त्यात 16 कायमस्वरूपी सदस्य आहेत. मात्र पक्षाची घटना कायमस्वरूपी सदस्यांना परवानगी देत नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *