पुणे: गेल्यावर्षी देशात पाऊस हवा तसा झाला नाही, त्यामुळे भारतातील अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती उद्धवली होती. मात्र, आता २०२४ मध्ये चांगला पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे ही बातमी शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. येत्या जून महिन्यापर्यंत एल निनो संपेल त्यामुळे मान्सूनमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव डॉ. एम राजीवन यांनी टाइम्सला सांगितले की, “हवामान अंदाज मॉडेल हे आशादायक चिन्हं दर्शवत आहेत. अल निनो कमकुवत होतो आहे आणि या वर्षी जुलैपर्यंत ला निनाचा संभाव्य विकास होण्याची ५० टक्क्यांपेक्षा जास्त शक्यता आहे. यामुळे २०२४ चा मान्सून चांगला राहण्याची अपेक्षा वाढवते. ला निना वर्षांमध्ये सामान्यतः चांगला मान्सून पाऊस पडतो.”

डॉ. राजीवन म्हणाले की, ऐतिहासिक डेटा विश्लेषणाने ला निना वर्षे आणि अनुकूल मान्सून परिणाम यांच्यातील परस्परसंबंध दर्शविला आहे. “२००३ चा अपवाद वगळता, जे एल निनो किंवा ला निना दोन्ही नसलेले न्युट्रल वर्ष होते. गेल्या काही निना वर्षांमध्ये चांगले मान्सून वर्ष दिले. यामध्ये १९७२-७३, १९८२-८३, १९८७-८८, १९९७-९८, २००२-२००३, २००९-१० आणि २०१५-१६ या वर्षांचा समावेश होता”, असंही त्यांनी सांगितलं.
नवी दिल्ली येथील भारत हवामानशास्त्र विभाग (IMD) अंकीय हवामान अंदाज प्रमुख डी. एस. पाई म्हणाले की, “अनेक हवामान मॉडेल्सवरुन असं दिसून येते की वर्षी जुलै-सप्टेंबर दरम्यान ला निना येण्याची शक्यता वाढली आहे. परंतु सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ला निना परिस्थितीत भारतात मान्सूनमध्ये पाऊस चांगला होतो.”
यूकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंगचे संशोधन शास्त्रज्ञ डॉ. अक्षय देवरस म्हणाले, “२०२३-२४ एल निनो ही एक मोठी घटना आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, अशा मोठ्या एल निनो घटनांपैकी ६०% पेक्षा जास्त घटना ला निना नंतर घडल्या. या वर्षीच्या नैऋत्य मोसमी हंगामात ला निना येण्याची दाट शक्यता आहे. त्याच्या तारखेचा अंदाज लावणे सध्या फार घाइचं होईल, सध्याच्या अंदाजानुसार जून-जुलैच्या तुलनेत ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ला निनाची अधिक शक्यता आहे.”स्वतंत्र हवामान अंदाजकार ऋषिकेश आग्रे म्हणाले, “अल निनो ते ला निना पर्यंतचे जलद संक्रमण २०२४ च्या मान्सूनमध्ये भारतात चांगला पाऊस पडण्याची शक्यता दर्शवते. ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, ज्यामुळे त्यांना शेती विषयक कामं आणि पीक उत्पादनासंबंधित कामाचा अंदाज बांधता येईल.”