धाराशिव : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अपेक्षे प्रमाणे काल भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती ती आता सत्यात उतरली असून या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरु होत्या. हे भारतीय जनता पार्टी मध्ये कधी प्रवेश करतात याकडे कार्यकर्त्याचे लक्ष लागले आहे. ४ फेब्रुवारी रोजी ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या मात्र तो प्रवेश झालेला नाही. अशोक चव्हाण यांच्या अलीकडच्या काळात चर्चा नसताना त्यांचा मात्र प्रवेश झाला अन् राज्यसभेची उमेदवारी देखील जाहीर झाली आहे.
काँग्रेस आणि अशोक चव्हाण….
स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांना काँग्रेसने मुख्यमंत्रिपदासह केंद्रीय गृहमंत्री केले. त्यांच्या पश्चात् अशोक चव्हाण यांना पक्षात पदे दिली आणि मंत्री केलं. मुख्यमंत्री सुध्दा केलं होतं. तरी सुध्दा अडचणीच्या काळात काँग्रेस पक्षाची साथ सोडत त्यांनी भाजपशी घरोबा केला अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.

बसवराज पाटील यांची राजकीय वाटचाल
माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांचे निकटवर्तीय आणि लाडके कार्यकर्ते अशी ओळख बसवराज पाटील यांची आहे. पहिल्यांदा निवडून आल्या नंतर पक्षाने त्यांना राज्यमंत्री केले. उमरगा-लोहारा मतदार संघ मागासवर्गीय यांना राखीव झाल्यानंतर औसा मतदार संघातून बस्वराज पाटील यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली. ते दोन वेळा औसा मतदारसंघाचे प्रतिनिधी होते.अभिमन्यू पवार यांनी पराभव केल्यानंतर बसवराज पाटील चर्चेतून बाजूला गेले.
बसवराज पाटील हे धाराशिव लोकसभेसाठी इच्छुक आहेत.परंतु, आघाडीच्या जुन्या फॉर्म्युल्याप्रमाणे ही जागा राष्ट्रवादीच्या वाटयाला जाते. तर, युतीच्या फॉर्म्युल्या प्रमाणे ही जागा शिवसेनेला जाते. भाजपला ही जागा इतर जागांच्या बदल्यात पदरात पाडून घ्यावी लागेल. पण या जागेसाठी माजी मंत्री तुळजापुरचे विदयमान आमदार राणाजगजितसिंह पाटील इच्छुक आहेत. मुरुम येथील भाजपाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष बस्वराज मंगरुळे हे सुध्दा इच्छुक आहेत. त्यांनी तर ५००/६०० गांवाना भेटी दिल्या आहेत. त्यांचा प्रचार सुरु आहे.धाराशिव लोकसभा उमेदवारी मिळत नसल्यास औसा मतदारसंघातून उमेदवारी बसवराज पाटील यांना हवी आहे. असे दबक्या आवाज सांगितल जातंय. परंतु विदयमान आमदार अभिमन्यू पवार हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय समजले जातात. अभिमन्यू पवार यांना डावलून बस्वराज पाटील यांना उमेदवारी मिळणे कठीण आहे.धाराशिव लोकसभा किंवा औशाची उमेदवारी यावर भाजपा पक्ष प्रवेशाचे घोडे अडले आहे, असे सांगितले जातंय. भाजपा श्रेष्ठीने दोन्ही पैकी एका जागाची उमेदवारी दिली तर भाजपा मध्ये बसवराज पाटील प्रवेश करतील अशी चर्चा आहे