• Tue. Apr 29th, 2025

संत सेवालाल महाराजांचे पाचवे वंशज ठाकरे गटात; उद्धव ठाकरे यांनी बांधलं शिवबंधन

Byjantaadmin

Dec 3, 2022

मुंबई: ठाकरे गटासाठी एक चांगली बातमी आहे. संत सेवालाल महाराज यांचे पाचवे वंशज अनिल राठोड यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मातोश्री निवासस्थानी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या निवासस्थानी अनिल राठोड यांनी हा प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हातात शिवबंधन बांधले.

संत सेवालाल महाराज यांचे पाचवे वंशज अनिल राठोड हे आज मातोश्री निवासस्थानी आले आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते अनंत गिते आणि खासदार अरविंद सावंत हे सुद्धा उपस्थित होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला.

शिवसेना फुटण्यापेक्षा जास्त वाढली आहे. रोज दिग्गज आणि साधी माणसं शिवसेनेत येत आहेत. वेगवेगळ्या विचारांची माणसं येत आहेत. त्यामुळे शिवसेना होती त्यापेक्षा अधिक मजबूत होत आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

अनंत गिते आणि अरविंद सावंत हे जुने नेते आहेतच. ते जुने आणि जाणते आहेत. नुसता जुना शब्द नको. जुनं असून चालत नाही. जाणते हा शब्द हवा. जाणते म्हटल्यावर या परिस्थितीत काय केलं पाहिजे हे त्यांना माहीत असतं, असं त्यांनी सांगितलं.

आजचा अनिल राठोड यांचा पक्षप्रवेश हा प्रातिनिधीक स्वरुपाचा प्रवेश आहे. आता हे पदाधिकारी राज्यभर जातील. वातावरण निर्मितीपेक्षा वातावरण प्रदूषित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला याच्यापुढे आळा बसेल, असंही ते म्हणाले.

प्रकाश आंबेडकरांबरोबर माझा एक कार्यक्रम झाला आहे. पुन्हा आमची भेट होईल. आम्ही सर्व महाराष्ट्रासाठी एकत्र येणार आहोत. महाराष्ट्र बंद पुरतेच एकत्र येऊन चालणार नाही, तर येणाऱ्या काळात स्वाभिमानी महाराष्ट्र उभा केला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

मागच्या सरकारने घेतलेल्या निर्णयावर शिंदे सरकारने स्थगिती दिली होती. त्यावर न्यायालयाने भाष्य केलं आहे. त्यावरही उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही कुठेही आप मतलबीपणा केला नाही. स्वार्थासाठी निर्णय घेतले नव्हते. जनतेच्या हिताचे निर्णय घेतले होते. मी सत्ता सोडल्यानंतर सरकारी कामाकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे मला त्याची अधिक माहिती नाही, असं ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed