• Tue. Apr 29th, 2025

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित प्रभात फेरीत दिव्यांग विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Byjantaadmin

Dec 3, 2022

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित प्रभात फेरीत दिव्यांग विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

· शहरातील 12 विद्यालायाचे विद्यार्थी झाले सहभागी

·जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दाखविली हिरवी झेंडी

लातूर दि.03 (जिमाका) : जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग, दिव्यांगांच्या विशेष शाळा आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शनिवारी (दि. 3) प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर प्रभात फेरीला सुरुवात झाली. शहरातील 12 विशेष शाळांमधील विद्यार्थी यामध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते.

समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, सहाय्यक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी नागेश मापारी, जीवन विकास प्रतिष्ठानचे संचालक अभय शहा, संजय निलेगावकर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे श्रीराम शिंदे, योगेश निटुरकर, श्री गजानन बहुउद्देशीय संस्थेचे अण्णासाहेब कदम यांच्यासह विशेष शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

जिल्हा क्रीडा संकुल येथून निघालेल्या प्रभात फेरीमध्ये विविध घोषवाक्य असलेले फलक घेवून दिव्यांग विद्यार्थी सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे जिल्हा परिषद इमारतीच्या प्रांगणात आल्यानंतर प्रभात फेरीचा समारोप करण्यात आला. यावेळी विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले.

लवकर निदान व उपचार करणे आवश्यक : अभिनव गोयल

शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांमध्ये दिव्यांगत्वाची लक्षणे असल्यास त्यांची लवकरात लवकर तपासणी करून निदान करून घ्यावे. तसेच आवश्यक उपचार करून संभाव्य दिव्यांगत्वाचे प्रमाण कमी करता येते, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी समारोपीय कार्यक्रमात सांगितले. लातूरमध्ये लेबर कॉलनीतील स्त्री रुग्णालय परिसरात शीघ्र निदान व उपचार केंद्र असून याठिकाणी आपल्या बालकांची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शासनाच्या नवीन धोरणानुसार दिव्यांगांचे 21 प्रकारात वर्गीकरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

उमंग सेंटर येथेही दिव्यांग जनजागृती रॅली

बार्शी रोडवरील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे असलेल्या उमंग सेंटर येथेही सकाळी सात वाजता जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. दिव्यांग बालकांसह पालकांनी या रॅलीत सहभाग नोंदविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed