• Tue. Apr 29th, 2025

खासदार ओमराजे निंबाळकर अन् आमदार राणाजगजीतसिंह पाटलांमध्ये खडाजंगी!

Byjantaadmin

Dec 3, 2022

उस्मानाबाद:-शिवसेना ठाकरे गटाचे  खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजपचे आमदार राणा जगजितसिंह यांच्यात बाचाबाची झाल्याचं समोर आलं आहे. शेतकऱ्यांच्या पीक विमा मुद्द्यावरुन दोघांमध्ये खडाजंगी झाली आहे.  खासदार ओमराजे निंबाळकर अन् आमदार राणाजगजीतसिंह पाटलांमध्ये उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शाब्दिक बाचाबाची झाली.  शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांसमोर देखील या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याची माहिती मिळाली आहे.

अन् ओमराजेंचा संताप अनावर झाला…

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत बैठकीत काहीतरी संवाद सुरु असताना राणाजगजीतसिंह पाटील यांनी ओमराजेंना ‘बाळ’ असं संबोधलं. यावर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांना ‘मला बाळ म्हणू नको,  तू तूझ्या औकातीत राहा, तुमचे संस्कार, तुमची औकात मला सगळं माहित आहे, जास्त बोलू नकोस, तुला मी बोललेलो नाही, तुझं बोलायचं कारण नाही’, असं म्हटलं. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली अन् या वादावर पडदा पडला.

पीक विम्याच्या विषयावरुन शेतकरी आक्रमक

पीक विम्याच्या मुद्द्यावरुन उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील हे जिल्हाधिकारी यांच्यासोबत पीक विमा प्रश्नी बैठक घेत असताना बाहेर गोंधळ सुरु झाला, आमदारांसोबत बैठक घेऊ नका, शेतकऱ्यांसोबत बैठक घ्या, यासाठी शेतकरी आक्रमक झाले होते.

शेतकरीऱ्यांसोबत पीक विमा प्रतिनिधी यांची बैठक घेण्यासाठी शेतकरी आग्रही आहे. फक्त आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या सोबत जिल्हाधिकारी बैठक घेत असल्याने शेतकरी संतप्त झाले होते.  शेतकऱ्यांना 2022 चा पीक विमा द्यावा यासाठी शेतकरी आक्रमक झाले होते. ऍग्रिकल्चर पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना कमी विमा दिल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.

याचदरम्यान खासदार ओमराजे निंबाळकर अन् आमदार राणाजगजीतसिंह पाटलांमध्ये हमरीतुमरी सुरु झाली. पिक विमा हा प्रश्न शेतकऱ्यांशी निगडित असल्याने शेतकऱ्यांना या बैठकीत समाविष्ट करावे करावे अशी मागणी करत काही शेतकरी करत होते.  हा शेतकऱ्याचा प्रश्न असताना शेतकऱ्यांना कलेक्टर केबिनच्या बाहेर उभा केल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच गोंधळ घातला. शेतकऱ्यांची मागणी आहे की, पिक विमा वेळेत मिळावा, प्रीमियम भरून देखील शेतकऱ्यांना पिक विमा मिळालेला नसल्याने शेतकरी गोंधळ करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed