• Sat. May 3rd, 2025

अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी

Byjantaadmin

Feb 14, 2024

मुंबई : भारतीय जनता पक्षाने आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या २४ तासांनंतर अशोक चव्हाण यांना लगेचच राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांनाही राज्यसभेची लॉटरी लागलेली आहे. दुसरीकडे विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पत्ता मात्र भाजपने कापलेला आहे. भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे तसेच पंकजा मुंडे यांच्या नावाचीही चर्चा होती. परंतु पुन्हा एकदा ही नावे वेटिंगमध्येच राहिली.

कोथरूडमधून तत्कालिन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विधानसभा निवडणूक लढल्याने मेधा कुलकर्णी यांना तिकीट कापलं होतं. गेल्या चार वर्षांपासून त्यांना डावलल्याची भावना निर्माण झालेली होती. जशीही विधान परिषद किंवा राज्यसभा निवडणूक यायची तेव्हा त्यांच्या नावाची चर्चा व्हायची. अखेर भाजपकडून त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलेलं आहे.

दुसरीकडे भाजपमध्ये प्रवेश करताच अशोक चव्हाण यांना देखील राज्यसभेची लॉटरी लागलेली आहे. कदाचित प्रवेश करण्याआधीच राज्यसभा उमेदवारीचं आश्वासन त्यांना भाजप पक्षश्रेष्ठींकडून दिलं गेलं असावं, अशीही चर्चा आहे.त्याचवेळी अजित गोपछडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर कार्यकर्ते असल्याने तसेच पक्ष संघटनेतील त्यांचा अनुभव लक्षात घेऊन त्यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिलेली आहे. त्याचवेळी मराठा-ब्राह्मण आणि लिंगायत समीकरण भाजपने साधलं आहे.

राज्यसभेचं गणित कसं आहे?

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. संख्याबळाचा विचार करता भाजप-अजित पवार गट आणि शिवसेनेच्या महायुतीला पाच जागा मिळण्यात काहीही अडचण नाही. महाविकास आघाडीला सहावी जागा मिळण्याची शक्यता आहे. ही जागा काँग्रेसची व संख्याबळानुसार त्याच पक्षाला मिळणे अपेक्षित आहे.

अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यावर भाजपने आता सहावा उमेदवारही उभा करण्याची जोरदार तयारी सुरू केल्याने काँग्रेसला ते अडचणीचे ठरू शकते. आत्तापर्यंत काँग्रेसकडे ४४ आमदार होते. राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी ४२ आमदारांची गरज आहे. आता दोन नेत्यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या आमदारांची संख्या केवळ ४२ राहिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप आणि महायुती महाराष्ट्र व मुंबई काँग्रेसला आणखी काही धक्के देण्याचा प्रयत्न करत आहे.

अशोक चव्हाण यांच्या भाजपप्रवेशाने काँग्रेस सावध

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रदेश काँग्रेसमधील अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आता आमदार एकसंघ राहण्यासाठी पक्षातर्फे प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी आज, बुधवारी मुंबईत आमदारांची तातडीची बैठक बोलावण्यात आली असून, या बैठकीत कोण कोण आमदार हजर राहतात, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मंगळवारी दिवसभर काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला मुंबईत ठाण मांडून होते. त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना आमदारांवर नजर ठेवण्याची सूचना केल्याचे कळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *