मुंबई: भारतीय जनता पक्षानं राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. त्यासाठी २७ फेब्रुवारीला निवडणूक होईल. त्यासाठी उद्यापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. भाजपच्या यादीत तीन जणांची नावं आहेत. अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांनी उमेदवारी देण्यात आली आहे.

अशोक चव्हाणांनी सोमवारी काँग्रेसच्या आमदारकीचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर अवघ्या २४ तासांत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर २४ तासांत त्यांना भाजपनं राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. भाजपकडे असलेलं संख्याबळ पाहता आणि निवडणुकीत विजयी होण्यासाठी निर्धारित असलेला कोटा लक्षात घेता चव्हाण यांचा विजय पक्का मानला जात आहे.राज्यात आतापर्यंत दोन माजी मुख्यमंत्र्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नारायण राणेंनंतर अशोक चव्हाण भाजपवासी झाले. आता चव्हाण राणेंच्या पावलावर पाऊल टाकताना दिसत आहेत. राणेंना भाजपनं राज्यसभेवर संधी दिली. आता तशीच संधी चव्हाणांना देण्यात आली आहे. काँग्रेसमधून आलेल्या दोन्ही नेत्यांना भाजपनं समान न्याय दिला आहे. कालच भाजपवासी झालेले चव्हाण नारायण राणेंच्या पावलावर पाऊल टाकताना दिसत आहेत.नारायण राणेंचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत आला आहे. भाजपनं जाहीर केलेल्या यादीत त्यांचं नाव नाही. राज्यसभेची टर्म संपत आलेल्या खासदारांना भाजप येत्या लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्याच्या तयारीत आहे. तसं झाल्यास राणेंना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिलं जाईल. अशा परिस्थितीत त्यांच्यासमोर ठाकरेंचे निष्ठावंत शिलेदार विनायक राऊत यांचं आव्हान असेल. राऊतांनी लोकसभेच्या गेल्या दोन निवडणुकांमध्ये नारायण राणेंचे पुत्र निलेश राणेंचा पराभव केला आहे.