सुमधुर नाट्यगीतांनी लातूरकर झाले मंत्रमुग्ध
लातूर (विमाका), दि.14: महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित महासंकृती महोत्सव व विभागीय 100 वे नाट्यसंमेलन अंतर्गत आयोजित नाट्यगीत महोत्सवाला गणेशस्तुती नाट्यगीताने प्रारंभ झाला. यावेळी बालगायकांनी गायलेल्या विविध नाटकांतील प्रसंगावर आधारित गाजलेल्या नाट्यगीतांनी लातूरचे नाट्यरसिक मंत्रमुग्ध झाले.

दयानंद महविद्यालयाच्या सभागृहातील कै.क.हे.पुरोहित कलामंच्यावर नाट्यगीत महोत्सव पार पडला. यावेळी सादर झालेल्या नाट्य गीतांना नाट्यरसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ‘उठ पंढरीच्या राजा’ – कौस्तुभ काटे, यशराज राठोड _ ‘जय शंकरा गंगाधरा’, रिदम दत्ता पाटील -‘खेळेल का रे माझी या अंगणी’, अपूर्वा पाटील-‘डमरू बाजे’, ईश्वरी जोशी- ‘संगीत रस सूर नाट्यपद’,समीक्षा कुरदले- ‘नारायना, रमा रमना,मधुसूदना मनमोहना,वेदांती लकशेटे – ‘काटा रुते कुणाला ‘ , अधिराज जगदाळे- ‘ हे सुरांनो चंद्र व्हा’ , श्रेया बनकर- ‘ उगवला चंद्र पुनवेचा’, तसेच सायली टाक व शरवरी डोंगरे यांनी ‘सुरत पीयाकी छिन बिसुराई’ या गायलेल्या नाट्यगिताने रसिकांना खिळवून ठेवले.

नाट्यगीत महोत्सवात सादर करण्यात आलेल्या संपूर्ण नाट्यगितांना प्रा. शशिकांत देशमुख यांनी हार्मोनियमवर, तर कौस्तुभ काटे याने टाळ व संजय सुवर्णकार यांनी तबल्यावर साथ दिली.
‘धनराशी, जाता मुढापाशी, सुखवी तुला, दुखवी मला’ हे नाट्यगीत व संत सोयराबाई यांच्या ‘अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग’ या डॉ. वृषाली देशमुख व सहकारी यांनी गायलेल्या भैरवीने महोत्सवाचा समारोप झाला.