नाटक माणसाच्या भावना, संवेदना जिवंत ठेवते !
· महासंस्कृती महोत्सव, विभागीय 100 वे नाट्य संमेलनात ‘नाटक माझ्या चष्म्यातून’ परिसंवाद
· आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पत्रकार विलास बडे यांचा सहभाग
· अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना नाटकाविषयी मंडळी मते
लातूर, दि. 14 (जिमाका): नाटक हे समाजाचा आरसा आहे. समाजातील घटनांचे प्रतिबिंब नाटकात उमटते. आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात हरवत चाललेली भावना, संवेदना नाटकामुळे जिवंत असल्याचा सूर आजच्या ‘नाटक माझ्या चष्म्यातून’ या परिसंवादात उमटला. महासंस्कृती महोत्सव आणि विभागीय 100 वे नाट्य संमेलन अंतर्गत आयोजित या परिसंवादात आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि पत्रकार विलास बडे सहभागी झाले होते. सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी यावेळी निवेदिकीची भूमिका पार पाडली.राजकारण, प्रशासन आणि प्रसारमाध्यम क्षेत्राचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या व्यक्तींचा सहभाग झालेल्या या परिसंवादामध्ये सोनाली कुलकर्णी यांच्या नाटकाबाबत त्यांची मते आणि आवडते नाटक याविषयी जाणून घेतली.
अनेकदा नाटक पाहताना आपण आपल्या जीवनाकडे कसे पाहावे, हे उमगायला मदत होते. सामाजिक वास्तव मांडणारी नाटके आमच्यासारख्या राजकीय व्यक्तींना समाजमनाचा मागोवा घेण्यासाठी मदत करतात. तसेच अनेकदा आरसा दाखविण्याची भूमिका पार पडतात. नाटक ही कला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. यासाठी ग्रामीण भागातही नाट्य स्पर्धांचे आयोजन होणे आवश्यक असून जिल्हा प्रशासनाने यामध्ये पुढाकार घेतल्यास या उपक्रमासाठी सर्व लोकप्रतिनिधी त्यांच्यासोबत राहतील, असे आमदार संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले.

दरवर्षी तालुका ते जिल्हा पातळीवर शालेय नाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न केले जातील. राज्य शासनात मंत्री म्हणून काम करताना कामगारांच्या नाट्य स्पर्धांचा बंद झालेला निधी सुरु करून त्यांच्या नाट्य स्पर्धा सुरु केल्याचे आमदार श्री. पाटील निलंगेकर यांनी सांगितले. लातूर येथे मराठवाड्यातील सर्वात मोठे नाट्यगृह उभा राहत असून त्यामुळे नाट्य कलावंतांना चांगले व्यासपीठ उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोरोना बाधित झाल्यानंतर उपचार घेत असताना नाटकानेच सोबत केली आणि सर्व वेदना विसरून सकारात्मकता निर्माण करण्यास मदत केली, असा अनुभव आमदार श्री. पाटील निलंगेकर यांनी यावेळी सांगितला.
लातूर जिल्ह्याला नाट्यकलेचा मोठा वारसा आहे. महासंस्कृती महोत्सव आणि विभागीय 100 व्या नाट्य संमेलनामुळे जिल्ह्यात नाट्य चळवळ वृद्धींगत होण्यास मदत होईल. लातूर आणि उदगीर येथे उभारण्यात येत असलेल्या नाट्यगृहांमुळे स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी मांडला.

नाटक हे जिवंत कला माध्यम असून आयुष्यात एकदा टाकलेले पाऊल पुन्हा मागे घेता येत नाही, हे नाटक शिकवते. तसेच प्रभावी प्रबोधनाचे कामही नाटकातून होते. ‘चार चौघी’ सारख्या काळाच्या पुढे जावून विचार मांडणाऱ्या नाटकाचा यावेळी त्यांनी आवर्जून उल्लेख केला. शिक्षणात लातूरचा पॅटर्न प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे नाट्य क्षेत्रातही लातूरचा वेगळा पॅटर्न तयार होण्यासाठी नाट्य संमेलनासारखे उपक्रम उपयुक्त ठरतील, असे मत जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी मांडले. तसेच विद्यार्थीदशेत असताना क्षणिक आनंद देणाऱ्या गोष्टींच्या मागे न लागता संपूर्ण आयुष्यात उपयुक्त आणि आनंददायी ठरू शकणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित युवक-युवतींना केले.

नाटक हे अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम आहे. समाजाला आरसा दाखविणे आणि चुकीच्या गोष्टींवर ओरखडे ओढण्याचे काम नाटक करते. पूर्वी अभिजनांपर्यंत मर्यादित असलेले नाटक आता खेडोपाडी पोहचत असून ‘वऱ्हाड निघालय लंडनला’ सारख्या नाटकांचा नाट्य चळवळ गावोगावी पोहचविण्यात मोठा वाटा असल्याचे पत्रकार विलास बडे यांनी सांगितले. सध्या समाज माध्यमांवर अनेक युवा कलाकार रील्सच्या माध्यमातून आपल्या कला सादर करताना दिसतात. त्यांच्या कलागुणांना वाव मिळणे आवश्यक आहे. नाटक समाजापर्यंत पोहचण्यासाठी समाज माध्यमे उपयुक्त ठरतील, असेही त्यांनी सांगितले. महाविद्यालयात असताना स्नेहसंमेलनात नाटकात काम करण्याची मिळालेली संधी आणि त्यावेळी घडलेला किस्सा श्री. बडे यांनी प्रक्षकांना सांगितला.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी परिसंवादात सहभागी सर्वांना प्रश्न विचारात त्यांचे नाटकाबाबतचे मत, आवडलेले पहिले नाटक, पाहिलेले शेवटचे नाटक आदी विषयावर बोलते केले. प्रारंभी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या लातूर शाखेचे शैलेश गोजमगुंडे यांनी प्रास्ताविकामध्ये परिसंवाद आयोजनाचा हेतू विषद केला.