स्थानिक कलावंतांनी जिंकली लातुरकरांची मने !
लोककलेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या परंपरेचे दर्शन
ज्येष्ठ रंगकर्मींचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मान
लातूर, (विमाका) : बाई मी जात्यावर दळण दळते…,वासुदेव आला हो, वासुदेव आला…, कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी… आदी गीतांवर महाराष्ट्राच्या पारंपरिक अशा विविध लोककलांचे सादरीकरण करून स्थानिक कलावंतांनी लातुरकरांची मने जिंकली. त्यांच्या कलांमधून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन उपस्थितांना झाले.महाराष्ट्र शासनाचा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग व लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने 100 वे विभागीय नाट्य संमेलन आणि पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दयानंद महाविद्यालयाच्या कै.नटवर्य श्रीराम गोजमगुंडे रंगपीठ यावरून कलाकारांनी पारंपरिक लोककलांचे सादरीकरण केले. ‘लोककलेचा जागर’ या कार्यक्रमामध्ये भूपाळी, गण, गवळण, अभंग, भारुड, पोवाडा आणि वगनाट्य आदींचा समावेश होता. कार्यक्रमास जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, ज्येष्ठ रंगकर्मी, स्थानिक कलावंत आदींची उपस्थिती होती. तनुजा शिंदे हिच्या लावणीलाही लातुरकरांनी पसंती दर्शविली. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. या कार्यक्रमात समूह नृत्यही सादर करण्यात आले.
स्फूर्तीदायक पोवाड्याने परिसरात रोमांच

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील ‘इथे ओशाळला मृत्यू’ हा स्फूर्तीदायक पोवाडा डॉ. संदीप जगदाळे यांनी सादर केला. रसिकांनी त्यांच्या कलेला भरभरून दाद दिली.
ज्येष्ठ रंगकर्मींचा सन्मान
लातुरात नाट्य चळवळीत भरीव योगदान देत असलेल्या ज्येष्ठ रंगकर्मींचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान जिल्हाधिकारी ठाकूर यांच्याहस्ते करण्यात आला. यामध्ये भारत थोरात, सूर्यकांत वैद्य, दिलीप सौताडेकर, अनिल महाजन, सूर्यकांत वैद्य, दिनकर कुलकर्णी, पवन वैद्य, डॉ. विश्वास शेंबेकर, बसू कानडे, शिरीष पोफळे, नंदू कुलकर्णी, नंदू वाकडे, सुरेश गिर आदींचा समावेश होता.