मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. (मुंबै बँक) आर्थिक अनियमितते प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांना क्लीन चिट दिली आहे.
ईओडब्ल्यूने एस्प्लानेड न्यायालयात दाखल केलेल्या सुमारे 15,000 पानांच्या आरोपपत्रातून दरेकर व्यतिरिक्त इतर तिघांची नावे देखील वगळण्यात आली आहेत. ईओडब्ल्यूने आरोपपत्रातून प्रवीण दरेकर, शिवाजी नलावडे, राजा नलावडे आणि प्रकाश शिरवाडकर यांची नावे वगळली आहेत.
दरेकर यांचे नाव वगळण्याबरोबरच मुंबई पोलिसांनी सोमवारी याप्रकरणी तीन जणांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. धक्कादायक बाब म्हणजे ज्या तिघांविरुद्ध पोलिसांनी सीआरपीसी कलम 299 अंतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे. त्यांच्याबाबत आरोपपत्रात म्हटले आहे की, हे आरोपी शोधण्यायोग्य नाहीत. या बहुचर्चित राज्यातील कथित बँक घोटाळ्यात 123 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. भाजप कार्यकर्ते आणि व्यवसायाने वकील विवेकानंद गुप्ता यांनी 2015 मध्ये मुंबईच्या एमआरए मार्ग पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी एफआयआर दाखल केला होता.
दरेकर यांचा मंत्री होण्याचा मार्ग झाला मोकळा
विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोअर टीमचे सदस्य मानले जातात. यामुळेच दरेकर मनसे सोडून भाजपमध्ये आले तेव्हा फडणवीस यांनी त्यांना विधान परिषदेचे सदस्य केले. यासोबतच दरेकर यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेही करण्यात आले. फडणवीस यांच्यामुळेच त्यांचा पहिला कार्यकाळ संपल्यावर त्यांना दुसऱ्यांदा विधान परिषदेचे सदस्य बनवण्यात आले. मुंबई बँक घोटाळ्यात त्यांचे नाव आल्याने दरेकर यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री करण्यात आले नाही. मात्र मुंबई पोलिसांकडून क्लीन चिट मिळाल्याने त्यांचा मंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.