• Tue. Apr 29th, 2025

विखे पाटलांकडून राज्यपालांचे गुणगान:महाराष्ट्र हा वीर मराठ्यांचा देश, या कल्पनेस धक्का बसत आहे; ठाकरेंची घणाघाती टीका

Byjantaadmin

Dec 3, 2022

विखे पाटील हे कधीकाळी मर्दमऱ्हाठे मावळे म्हणून शिवरायांचे भक्त होते. आज भाजपात जाऊन त्यांना शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांचे गुणगान करावे लागते. वीर मराठ्यांचा हा देश आहे या कल्पनेस यामुळे धक्का बसतो, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केली आहे.

ठाकरेंचे मुखपत्र असलेल्या सामनात आज म्हटले आहे की, भाजपचे शिवप्रेमाचे ढोंग रोज उघडे पडत आहे. त्यामुळे छत्रपती उदयन राजे म्हणतात तेच खरे की, ‘छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे सत्तेवर कसे राहू शकतात?’ हा निर्लजपणाच आहे.

ठाकरेंनी म्हटले आहे की, भारतीय जनता पक्ष हा नक्की किती तोंडी नाग आहे? त्यावर आता नव्याने संशोधन करायला हवे. एखाद्या विषयावर हवे तेव्हा वळवळायचे किंवा फूत्कार सोडायचे व नको असेल तेव्हा बिळात घुसायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमान प्रश्नी भाजप नेमके हेच करीत आहे. छत्रपतींचा अपमान महाराष्ट्राच्या राज्यपालांनी करूनही त्यांच्या धमन्या थंडच आहेत व ज्यांनी उसळून तलवार काढली आहे त्यांच्यावर हल्ले सुरू केले आहेत. आता महसूलमंत्री विखे पाटील यांनी राज्यपालांचा बचाव केला आहे. कोश्यारींविरोधात लोकभावना भडकविण्याचा विरोधकांचा डाव असल्याचे विखे पाटलांनी सांगितले. विखेंनी असे बोलणे हा महाराष्ट्राच्या लोकभावनेचाही अपमान आहे.

ठाकरेंनी म्हटले आहे की, राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपतींच्या संदर्भात अपमानास्पद विधाने करावीत हे विखे पाटील वगैरे लोक सहन करतील; कारण सध्या ते ज्या पक्षाच्या पखाली वाहत आहेत त्या पक्षाचे ते धोरण आहे. पण विखे पाटलांचे मत हे महाराष्ट्राचे तर सोडाच, पण त्यांच्या नगर जिल्हय़ाचेही मत नाही. त्यामुळे त्यांच्या बुळचट भूमिकांकडे लक्ष द्यायचे कारण नाही.

ठाकरेंनी म्हटले आहे की, सातारचे छत्रपती उदयनराजे भोसले यांनी खवळून सांगितले, ‘छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे सत्तेवर राहतात हा निर्लज्जपणा आहे.’ यावर विखे पाटील वगैरे लोकांचे काय म्हणणे आहे? राज्यपालांविरुद्ध लोकभावना भडकलेल्याच आहेत. त्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाही, पण दुःख हे की, महाराष्ट्राचे वरिष्ठ मंत्री अपमानाचे समर्थन करीत आहेत.

मऱ्हाटी मनगटे थंड पडली

ठाकरे म्हणाले की, स्वराज्याची गरज होती म्हणून महाराजांनी अफझल खानाचा कोथळा काढला. शाहिस्ते खानाची बोटे छाटली. स्वराज्याचा लढा साधा नव्हता. ते एक महान शौर्य होते. चारशे वर्षांनंतर त्या इतिहासावर संशोधन करून आता काय साध्य होणार? आधीच शालेय क्रमिक पुस्तकांतून खरा इतिहास हद्दपार झाला. तेथेच मऱ्हाटी मनगटे थंड पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed