• Tue. Apr 29th, 2025

मराठवाडयातील सेंद्रीय उत्पादने मुंबईकरासाठी होणार उपलब्ध सौ. अदिती अमित देशमुख यांचा पुढाकार

Byjantaadmin

Dec 3, 2022

मराठवाडयातील सेंद्रीय उत्पादने मुंबईकरासाठी होणार उपलब्ध
शालेय विदयार्थी साधणार शेतकऱ्याशी संवाद

ट्वेन्टीवन ॲग्री लि. माध्यमातून शेतकरी ते थेट ग्राहक
सेंद्रिय शेतीमाल विक्रीसाठी व्यवस्था

सौ. अदिती अमित देशमुख यांचा पुढाकार

लातूर (प्रतिनिधी):   मुंबईतील ग्राहकांना सकस आणि शेतकऱ्यांनी पिकवलेला दर्जेदार शेतमाल, भाजीपाला सेंद्रीय उत्पादने उपलब्ध व्हावीत, शेती आणि शेतकऱ्यांची शहरातील विदयार्थ्यांना ओळख व्हावी. तसेच मराठवाडयातील शेतकर्‍याना सेंद्रिय पद्धतीने उत्पादीत केलेला भाजीपाला, शेतीमाल, सेंद्रीय पदार्थ थेट पध्दतीने ग्राहकांना रास्त दरात उपलब्ध व्हावीत, त्याचबरोबरबशेतकर्‍यांना देखील त्यांच्या शेतमालांची योग्य किंमत मिळावी ही बाब विचारात घेऊन ट्वेन्टीवन ॲग्री लि., माध्यमातून संचालीका सौ. अदिती अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून शेतकरी ते थेट ग्राहक सेंद्रिय शेतीमाल विक्री व्यवस्था गोल्डक्रेस्ट हाय, वाशी, मुंबई येथे केलेली आहे.
येत्या शनिवार दि. ३ व रविवार दि. ४ डिंसेबर २०२२ रोजी ट्वेन्टीवन ॲग्री लि., गोल्डक्रेस्ट हाय, वाशी, व मराठवाडयातील सेंद्रीय शेतीमाल उत्पादक शेतकऱ्यांच्या संयुक्त विदयमाने सेंद्रीय शेतमाल बाजार गोल्डक्रेस्ट हाय, प्लॉट नंबर ५९, सेंक्टर २९, वाशी, येथे सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० यावेळेत आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख, ट्वेन्टीवन ॲग्री लि., च्या संचालीका सौ.अदिती अमित देशमुख, प्राचार्य सौ. कवीता मल्होत्रा यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून गोल्डक्रेस्ट हायचे प्राचार्य, ट्वेन्टीवन ॲग्री लि. संस्थेचे पदाधिकारी,अधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत.

मुंबईसह महानगरातील विदयार्थ्यांना शेती, शतीपूरक व्यवसाय, शेतमाल याबाबत माहिती नसते. दैनदीन जिवनात लागणारे अन्नपदार्थ सुपरमार्केट व मॉलमधूनच मिळतात असा त्यांचा समज असतो. या विदयार्थ्यांना पाठ्यपुस्तकीय ज्ञानाच्या पलीकडे जाऊन, घरातील लागणारे अन्न पदार्थ कसे उत्पादीत होतात व कोठून येतात यांची त्यांना माहिती नसते. तर दुसरीकडे शेतकरी शेतमाल, भाजीपाला पिकवतो पण त्याला योग्य मोबदला मिळत नाही. या सर्व बाबीचा विचार करून ट्वेन्टीवन ॲग्री लि., गोल्डक्रेस्ट हाय, वाशी, व मराठवाडयातील सेंद्रीय शेतीमाल उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सेंद्रीय शेतमाल बाजार गोल्डक्रेस्ट हाय येथे आयोजित केला आहे. यादिवशी शेतकऱ्यांना वेगवेगळे स्टॉल लावता येणार आहेत. येथे शेतकऱ्यांनी मांडलेल्या स्टॉलचे व्यवस्थापन काही वेळापूरते करुन आपणही शेतकरी झाल्याचा आनंद या शाळेतील विदयार्थ्याना या अभिनव उपक्रमातून घेता येणार आहे.
गोल्डके्रस्ट हाय याठिकाणी उभारण्यात येणाऱ्या स्टॉलच्या माध्यमातून मराठवाडयातील शेतकऱ्यांचा माल ग्राहकांना खरेदी करता येईल. तसेच विदयार्थ्याना आलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधता येणार आहे, वेगवेगळा शेतमाल, भाजीपाला, सेंद्रीय पदार्थांची पाहणी करता येईल, शेतकऱ्यांकडून सेंद्रीय शेती उत्पादनाचे फायदे व रासायनीक शेतीचे दुष्परिणाम, सेंद्रीय शेतीची कार्यपध्दती समजून घेता येईल. या उपक्रमातून शहरावाशीयांना शेती आणि शेतकऱ्यांना जाणून घेता येईल याकरीता हा उपक्रम आयोजित करण्यात आला
आहे.

गोल्डक्रेस्ट हाय, वाशी येथील शाळेच्या आवारात दर शुक्रवारी स्थानिकांना ताजी, सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला, फळे, सेद्रींय पदार्थ आणि शेतमाल थेट शेतकऱ्यांकडून ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कृषी क्षेत्रातील स्टार्टअप कंपनी ट्वेन्टीवन ॲग्री लि., लातूर जिल्हयात सेंद्रिय शेती, सुगंधी वनस्पती शेती, अश्वगंधा लागवड योजना माध्यमातून काम करीत आहे. हे करत असतांना सोयाबीन, तुर डाळ, बिट यांसारखी पूरक पिके घेण्यासाठी शेतकऱ्‍यांना प्रोत्साहीत करीत आहे. या अभिनव उपक्रमातून सेंद्रीय शेतीमाल उत्पादक लातूरसह मराठवाडयातील शेतकऱ्यांना आर्थिक फायदा आणि महानगरातील ग्राहकांना आरोग्यदायी, विषमुक्त शेती उत्पादने उपलब्धहोणार आहेत. ही व्यापकदृष्टी ठेऊन हा अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला आहे, तसेच या संदर्भात अधिक माहितीसाठी दत्ता वाघमारे 9604300021 यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन असे गोल्डक्रेस्ट हाय, येथील डॉ. सविता साबळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed