• Mon. May 5th, 2025

‘महत्त्वाचं संसदीय कामकाज, संसदेत हजर राहा’, भाजपकडून खासदारांना व्हीप जारी

Byjantaadmin

Feb 10, 2024

नवी दिल्ली : देशाच्या संसदेचं २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचं अखेरचं अधिवेशन सुरु आहे. संसदेतील लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजाचा आज अखेरचा दिवसआहे. भारतीय जनता पक्षानं राज्यसभा आणि लोकसभेतील त्यांच्या खासदारांना व्हीप बजावला आहे. महत्त्वाचं कामकाज करण्यात येणार असून त्यासाठी उपस्थित राहा, असं भाजप खासदारांना सांगण्यात आलं आहे.

भाजप धक्कातंत्र वापरणार?

लोकसभा आणि राज्यसभेच्या आजच्या कामकाजामध्ये काही विशेष उल्लेख करण्यात आलेला नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी संसदेच्या अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. काही भाजप नेत्यांकडून राम मंदिराच्या उभारणीबाबत संसदेत अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीचं काम सुरु करण्यात आलं होतं. मात्र, नरेंद्र मोदी सरकार धक्कातंत्राचा वापर करेल की नाही याबाबत अंदाज वर्तवले जात आहेत.

संसदेच्या कामकाजात वाढ

लोकसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या अधिवेशनाचा कालावधी ९ फेब्रुवारीला संपणार होता. मात्र, लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजात एका दिवसाची वाढ करण्यात आली. अधिवेशन एका दिवसानं वाढवण्यात आल्यानंतर भाजपनं लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना व्हीप बजावला आहे. त्यामुळं आज भाजपकडून नेमक्या कोणत्या कारणासाठी व्हीप लागू करण्यात आला आहे. याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. भाजप आजच्या दिवशी पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करु शकते, अशा देखील चर्चा रंगल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी

संसदेचं अधिवेशन संपल्यानंतर निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. १७ व्या लोकसभेचा कार्यकाल संपण्यापूर्वी निवडणुकीचे निकाल जाहीर होऊ शकतात. देशात सध्या राज्यसभेच्या ५६ जागांची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे ही प्रक्रिया २९ फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे. राज्यसभा निवडणूक पार पडल्यानंतर लोकसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रातील भाजप सरकार आज संसदेच्या दोन्ही सभागृहात नेमका कोणता प्रस्ताव आणणार याकडे लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *