• Mon. May 5th, 2025

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना हल्ल्यात मरणारी लोकं कुत्र्याची पिल्लं वाटतात का? संजय राऊतांचा सवाल

Byjantaadmin

Feb 10, 2024

मुंबई: उद्या एखादा कुत्रा गाडीखाली आला तरी विरोधी पक्ष गृहमंत्र्यांचा राजीनामा मागेल, असे वक्तव्य करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर संजय राऊतांनी टीकास्त्र सोडले आहे. देवेंद्र फडणवीस यांना हल्ल्यात मरणारी लोकं कुत्र्याची पिल्लं वाटतात का, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. ते शनिवारी MUMBAIत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. 

यावेळी संजय राऊत यांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच केलेल्या एका वक्तव्याबद्दल विचारणा करण्यात आली. अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर विरोधी पक्षांनी गृहमंत्री असलेल्या फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावर फडणवीसांनी म्हटले होते की, उद्या एखाद्या गाडीखाली कुत्रा आला तरी विरोधी पक्ष गृहमंत्र्याचा राजीनामा मागतील. मग अभिषेक घोसाळकरांच्या मृत्यूसारख्या गंभीर प्रकरणात विरोधी पक्षांनी माझा राजीनामा मागितला असेल, तर मला त्यामध्ये फारसे विशेष असे काही वाटत नाही. 

फडणवीसांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत राऊतांनी म्हटले की, गृहमंत्री फडणवीसांच्या लेखी अभिषेक घोसाळकर हा कुत्र्याचं पिल्लू होता का? अभिषेक घोसाळकर हा शिवसेनेचा तरुण कार्यकर्ता होता. त्याला भाजपशी संबंधित असलेल्या मॉरिस नोरोन्हाने गोळ्या झाडून मारले. अभिषेक घोसाळकर यांच्या वडिलांचा, पत्नीचा आणि लहान मुलीचा आक्रोश देवेंद्र फडणवीसांना विचलित करत नाही का? हल्ल्यात मरणारी लोक कुत्र्याची पिल्लं आहेत का?देवेंद्र फडणवीस ही कोणती भाषा वापरत आहेत, असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी विचारला. यावेळी संजय राऊत यांनी फडणवीसांवर तिखट भाषेत टीका केली. तुम्ही दिल्लीला जाऊन शेपूट हलवता आणि इकडे येऊन आमच्यावर भुंकता. सरकार बदलल्यानंतर या सगळ्याचा हिशेब होईल, असेही राऊत यांनी म्हटले. 


गुंडांसोबत सेल्फी काढणाऱ्या मुख्यमंत्री शिंदेंची एसआयटी चौकशी झाली पाहिजे: संजय राऊत

राज्यात एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेने भाजपची गुंडगिरी सुरु आहे. महाराष्ट्रात अशी परिस्थिती कधीच नव्हती. गुन्हेगारीच्या बाबतीत MAHARASHTRAने बिहारलाही मागे टाकले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपुत्र दररोज गुंडांना भेटतात, त्यांच्यासोबत सेल्फी काढतात. यासाठी गृहमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर एफआयआर दाखल केला पाहिजे. तसेच EKNATH SHINDE ंची एसआयटी स्थापन करुन चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *