पुणे : पुणे पोलिसांना माझ्या गाडीवर हल्ला होणार हे आधीच माहिती होतं. तशी शक्यता त्यांनी वर्तवली होती. परंतु तरीही त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना अडवलं नाही. अगदी सिनेमातील पोलिसांसारखी त्यांनी भूमिका बजावली, असा गंभीर आरोप ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केला आहे. महाराष्ट्राचे पोलीस दल हे भाजपने विकत घेतलेले आहे. रश्मी शुक्ला यांना ज्यांनी पोलीस महासंचालक केले, त्या पोलीस दलाला काही नैतिकता राहिलेली नाही, अशा शब्दात वागळे यांनी महाराष्ट्र पोलिसांना लक्ष्य केले.गेली ४ दशके व्यवस्थेला ‘निर्भय’पणे सवाल विचारून सत्ताधाऱ्यांना भांडावून सोडणारे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांनी आज सायंकाळच्या सुमारास हल्ला केला. पुण्यातील दांडेकर पुलानजीक असेलल्या राष्ट्र सेवा दलातील सभागृहात वागळे यांची निर्भय बनो सभेचे आयोजन केले होते. त्या सभेला वागळे जात असताना डेक्कन येथील खंडोजी बाबा खोपडे चौकात त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतरही निखिल वागळे यांनी सभास्थळी पोहोचून त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने जोरदार आवेशात भाषण करून सत्ताधाऱ्यांना रोखठोक प्रश्न विचारले.

सनातन्यांनी पानसरे-दाभोलकर-गौरी लंकेश यांना मारलं. तुम्ही कधीही आमचा जीव घेऊ शकता. कारण आम्ही निहत्थे आहोत. जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याला फुले शाहू आंबेडकर वाचवतात, अशी माझी श्रद्धा आहे. जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत, तोपर्यंत फॅसिझमशी संघर्ष करू, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. त्याचवेळी माझ्या गाडीवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना मी बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेऊन माफ करतो, असंही निखिल वागळे म्हणाले.गेल्या ४० वर्षांतील माझ्यावर हा सातवा हल्ला झाला. प्रत्येक हल्लातून सुखरूप बचावलो. आज तर मी माझं मरण डोळ्यासमोर पाहिलं. गाडीवर दगडफेक होत होती. लाठ्या काठ्या मारल्या जात होत्या. माझ्यासोबत गाडीत बसलेल्या वकील असीम सरोदे यांनी माझं रक्षण केलं, नाहीतर माझं डोकं फुटलं असतं. जोपर्यंत माझं डोकं शाबूत असेल तोपर्यंत मी प्रश्न विचारणं सुरूच ठेवेन, असेही वागळे म्हणाले.महात्मा फुले यांना मारायला मारेकरी आले होते. परंतु महात्मा फुले यांनी त्या मारेकऱ्यांचं प्रबोधन करून त्यांचे मत परिवर्तन केलं. मला जर संधी मिळाली तर मी भाजपवाल्यांचं मतपरिवर्तन करेन, असं निखिल वागळे म्हणाले. त्यानंतर सभास्थळी असलेल्या उपस्थितांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला.