• Mon. May 5th, 2025

बागेश्वर बाबा देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, रोहित पवारांची खोचक टीका

Byjantaadmin

Feb 9, 2024

बागेश्वर धामचे प्रमुख असणारे धीरेंद्र कृष्णशास्त्री यांनी नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीवरुन शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीसांना खोचकपणे लक्ष्य केले आहे. रोहित पवार यांनी ट्विट करुन बागेश्वर बाबा यांनी महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या संत तुकाराम महाराजांविषयी केलेल्या अवमानजनक वक्तव्याची आठवण करुन दिली. हाच धागा पकडत रोहित पवार (Rohit Pawar) यांनी म्हटले की, ‘कथित बागेश्वर बाबाची उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस साहेबांसोबत पुण्यात भेट झाल्याची बातमी वाचनात आली. या भेटीच्या वेळी जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांविषयी या कथित बाबाने काढलेले अनुद्गार हे चुकीचेच आणि तमाम मराठी माणसाच्या भावना दुखावणारे होते अशा स्पष्ट शब्दांत फडणवीस साहेबांनी त्यांना यावेळी सुनावलं असेल आणि यापुढंही MAHARASHTRA तील संतांविषयी आणि थोर व्यक्तींविषयी अशी बेताल वक्तव्ये करु नयेत, अशी तंबीही दिली असेल अशी अपेक्षा आहे.’, असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

बागेश्वर बाबा संत तुकाराम महाराजांविषयी काय म्हणाले होते?

बागेश्वर बाबा यांनी २०२३ साली संत तुकाराम महाराजांविषयी अनुद्गार काढले होते. संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची. म्हणूनच त्यांनी देवाचा धावा घेतला, अशी मुक्ताफळं बागेश्वर बाबा यांनी उधळली होती. बागेश्वर बाबा यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. 


बागेश्वर बाबांनी मागितली माफी

बागेश्वर बाबांनी काही महिन्यांपूर्वी पुण्यात आल्यानंतर संत तुकाराम महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याविषयी दिलगिरी व्यक्त केली होती. त्यांनी देहूमध्ये जाऊन तुकारामांच्या पादुकांचे दर्शन घेतले होते. माझ्या वाचनात ज्या गोष्टी आल्या त्याआधारे मी मांडणी केली होती. मात्र, माझ्या या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या गेल्या. याबद्दल मी माफी मागतो, असे बागेश्वर बाबांनी म्हटले होते. तुकाराम महाराजांनी इंद्रायणी नदीत बुडवलेल्या गाथा तपबळाच्या आधारे बाहेर काढल्या. पाण्याला स्पर्शही न करता, न भिजता त्यांनी गाथा बाहेर काढल्या. ही आपली संत परंपरा आहे. या संतांचा आशीर्वाद आपल्यावर राहिला छत्रपती शिवाजी महाराज यांचा हिंदू स्वराज्य स्थापनेचा संकल्प पूर्ण होईल आणि भारत हिंदू राष्ट्र बनेल, असे बागेश्वर बाबा यांनी म्हटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *