• Mon. May 5th, 2025

घोळ एका कंडक्टरने केला अन् शिक्षा सर्वांना.. एस.टी कर्मचारी पुन्हा जाणार संपावर?

Byjantaadmin

Feb 9, 2024

एका अपहाराच्या घटनेवरून एसटीच्या सर्व वाहकांना संशयाच्या कठडयात उभे करून, वेठीस धरणे हा केवळ मूर्खपणा आहे. तसेच अपहार रोखण्यासाठी कर्तव्यावर असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या खिशात हात घालून झाडझडती घेण्याचे उद्दाम परिपत्रक काढणाऱ्या अधिकाऱ्यांना वरिष्ठांनी ताबडतोब समज द्यावी अन्यथा प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अशा उद्दामखोर परिपत्रकमुळे उद्रेक होऊन त्याचा परिणाम आंदोलनामध्ये होईल, व तशी वेळ आणू नये,असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिला आहे.

इस्लामपूर(सांगली जिल्हा) आगारांमध्ये एका वाहकाने ओंड्रॉइड मोबाईल मध्ये ॲप तयार करून त्याद्वारे तिकीट विक्री करून अपहार केला व त्या द्वारे एसटी महामंडळाचे उत्पन्न बुडवण्याचा प्रकार घडला, ही घटना दुर्दैवी आहे.

पण अशा घटनांमधून एसटीच्या तांत्रिक यंत्रणेचा दोष दिसून येत आहे.एसटीच्या मध्यवर्ती संगणकीय कक्षाचे तिकीट विक्री मशीनवर नियंत्रण असताना असा प्रकार त्यांच्या लक्षात का आला नाही? त्यांना विचारणा करण्या ऐवजी राज्यातील सर्व एसटी वाहकांची तपासणी करावी, किंबहुना महिला वाहकांचे खिसे तपासावेत असे तुघलकी फर्मान वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढले आहे.अशा कृतीमुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या महिला वाहकांचे मनोधैर्य खच्ची होत आहे.आणि भविष्यात आपल्या कामगिरी बद्दल नैराश्य निर्माण होऊन त्यातून कर्मचाऱ्यांच्या मध्ये उद्रेक निर्माण होऊन पूर्वी साडे पाच महिने संपात होरपळलेल्या एसटीला आणखी एका मोठ्या आंदोलनाला तोंड द्यावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण होऊ नये ,यासाठी अश्या बेजबाबदारपणे परिपत्रक काढणाऱ्या अधिकाऱ्यांना वरिष्ठांनी समज द्यावी.असा इशाराही बरगे यांनी दिला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *