• Mon. May 5th, 2025

‘वटवृक्ष’ चिन्ह शरद पवार गटाला देऊ नका; विश्व हिंदू परिषद

Byjantaadmin

Feb 9, 2024

मुंबईः शरद पवार विरुद्ध अजित पवार सत्तासंघर्षात निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या बाजूने निकाल दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव, पक्षचिन्ह अजित पवार गटाकडे गेल्याने शरद पवार गटाला नवीन नाव मिळालं आहे.शरद पवार गटाकडून आयोगानं तीन नावं मागवली होती. त्यांपैकी एक नाव त्यांना मिळालं. त्यानुसार, निवडणूक आयोगानं शरद पवारांना दिलेलं नाव हे ‘नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ असं आहे.निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नाव दिलं मात्र अद्याप चिन्ह दिलेलं नाही. शरद पवार गटाकडून वटवृक्ष या चिन्हाची मागणी केल्याचं वृत्त माध्यमांमधून प्रसारित झालं. त्यानंतर विश्व हिंदू परिषदेने या लोगोला विरोध केलाय.मागील ६० वर्षांपासून विश्व हिंदू परिषदेचा नोंदणीकृत लोगो वटवृक्षाचा आहे. त्यामुळे हा लोगो कुणालाही दिला जावू नये, अशी मागणी त्यांनी केलीय. विहिंपचे सरचिटणीस मिलिंद परांडे यांनी याबाबत भूमिका मांडली आहे.

परांडे म्हणाले की, निवडणूक आयोगात एनसीपीच्या नोंदणीची प्रक्रिया सुरु आहे. या प्रोसेसमध्ये त्यांना जो लोगो दिला जातोय किंवा ऑफर केला जातोय तो वटवृक्षाचा लोगो आहे. परंतु मागच्या ६० वर्षांपासून विश्व हिंदू परिषदेचा हा नोंदणीकृत लोगो आहे. विहिंपने धार्मिक, सामाजिक, आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम केलेलं आहे. त्यामुळे एखाद्या राजकीय पक्षाला हा लोगो दिला तर संभ्रम निर्माण होईल. म्हणून निवडणूक आयोगाने कुणालाही वटवृक्षाचा लोगो देऊ नये, अशी मागणी मिलिंद परांडे यांनी केली आहे.दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली जात आहे. मात्र यापूर्वीच अजित पवार गटाने मागणी केली आहे की, विरोधी पक्षाकडून प्रकरणात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यापूर्वी बाजू मांडण्याची संधी मिळावी. तसं कॅव्हेट दाखल करण्यात आलेलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *