गेल्या काही दिवसांपासून राज्यात होत असलेल्या गोळीबाराच्या घटनांमुळे एकच खळबळ उडाली आहे. उल्हासनगर येथे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटातील नेत्यावर गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर काल ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर विरोधकांनीकडून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात आहे. यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

अजित पवार म्हणाले की, ही घटना अतिशय चुकीची घडली आहे. पण आपण जर पहिलं तर व्हिडीओमध्ये दोघे गप्पा मारत आहेत. दोघांचं संभाषण स्पष्ट आहे. ते ऐकल्यावर दोघांचे मित्रत्वाचे संबंध असून चांगली ओळख असल्याचं दिसत आहे. याचा व्यवस्थित तपास झाला पाहिजे. उठताना पण घोसाळकर बोलत आहेत. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे, अशा घटना कुठेच होता कामा नयेत.
पण बाहेर सगळी पोलीस यंत्रणा असेल, आत दोघे त्यांच्या धंदा-पाण्याच्या गोष्टी अतिशय आपलेपणाने करत आहेत. एकजण हाफ पँन्ट आणि टी शर्टमध्ये दिसतोय. त्यानंतर अशी गोष्ट घडली. याचा तपास केला गेला पाहिजे, असे AJIT PAWAR म्हणाले.विरोधक मोठ्या प्रमाणावर सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. गृहमंत्र्यांचा राजीनामा मागण्यासाठी त्यांना निमीत्त मिळालं आहे. आम्ही नाकारत नाही, पण यामागची पार्श्वभूमी तपासली पाहिजे. दोघं बोलत असताना सिक्युरिटीला बाहेर थांबायला सांगितल्यानंतर तो बाहेरच थांबणार. झालेली घटना दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी याबद्दल वर्षा बंगल्यावर चर्चा देखील केली आहे, मी सीपी आणि एसपींना याविषयी बोलणार आहे, कुणा गुंडाची मस्ती सुरू असेल तर पोलिसी खाक्या दाखवावा लागेल असं त्यांना सांगितलं आहे असेही अजित पवार म्हणाले.
राज्यातील गोळीबाराच्या घटनांवर बोलताना अजित पवार म्हणाले की, पहिली घटना मुळशी येथे घडली ते गुंड प्रवृत्तीचेच होते. गुंडानीच गुंडाचा काटा काढला. उल्हासनगरच्या घटनेबाबत जरी ते सत्ताधारी पक्षाचे आमदार असले तरी कारवाई तात्काळ करण्यात आली. त्यांच्यातील गोळीबार जमीनीच्या व्यवहारातून झालं आहे. ते तर निवांत पोलीस स्टेशनला बसले होते. त्या घटनेत पोलिसांचं कौतुक केलं पाहिजे. गोळ्यांचा आवाज आल्यानंतर दोन पोलीस आतमध्ये आले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींना रुग्णालयात नेलं. सध्या ते धोक्याबाहेर आहेत. पण पोलीसांनी सत्ताधारी पक्षाच्या आमदारास लगेच अटक केली आणि आता पुढील कारवाई केली जात आहे, असे अजित पवार म्हणाले.
तीन्ही वेगवेगळ्या घटना पाहिल्या तर एक जमीनीच्या वादातून घडल्याचे दिसते , दुसरी कशातून आहे ते निष्पन्न होईल. तिसरी गँगवॉरमधून झाली आहे असेही अजित पवारांनी स्पष्ट केलं.