• Mon. May 5th, 2025

ना जेलमध्ये जायचं ना शिंदे गटात, रवींद्र वायकर यांची निकटवर्तींयाकडे उद्विग्नता पण ईडीपुढे काही चालेना!

Byjantaadmin

Feb 9, 2024

मुंबई : ईडीच्या निशाण्यावर असलेले तरीही उद्धव ठाकरे यांना खंबीरपणे साथ देणारे आमदार रवींद्र वायकर यांच्याबद्दलच्या उलटसुलट राजकीय चर्चांना सुरूवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून वायकर ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश करतील, अशी अटकळ बांधली जातीये. दुसरीकडे ईडीच्या कारवाईत ना जेलमध्ये जायचं ना मला ठाकरेंची साथ सोडायची आहे, परंतु पक्ष सोडण्यासाठी माझ्यावर दबाव असल्याकारणाने नाईलाजास्तव मला राजकीय निर्णय नजीकच्या काळात घ्यावा लागेल, अशा उद्विग्न भावना त्यांनी त्यांच्या निकटवर्तीयांकडे बोलून दाखवल्याचं ‘मटा’ला सूत्रांनी सांगितले.

मुंबई महापालिकेचा मैदानासाठीचा आठ हजार चौरस मीटरच्या राखीव भूखंडावर फसवणुकीने पंचतारांकित हॉटेल उभारणी आणि मनी लॉंडरिंगप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रवींद्र वायकर यांची सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून चौकशी सुरू आहे. तूर्त या प्रकरणात वायकरांना अटक करण्यात आलेली नाही. मात्र, आवश्यकतेनुसार पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे, असे ‘ईडी’तील सूत्रांनी स्पष्ट केले.

ना जेलमध्ये जायचं ना शिंदे गटात, वायकर यांची द्विधा मनस्थिती

ईडीच्या कारवाईमुळे रवींद्र वायकर गेल्या अनेक दिवसांपासून त्रस्त आहेत. मी कोणताही गैरव्यवहार केला नाहीये परंतु तरीही राजकीय आकसापोटी माझ्या मागे चौकशीचं शुक्लकाष्ट लागलेले आहे. मी हाडाचा शिवसैनिक आहे. उद्धव ठाकरे यांची साथ मला सोडायची नाहीये, अशा भावना त्यांनी त्यांच्या निकटवर्तीयांकडे बोलून दाखवल्या आहेत. परंतु दुसऱ्या ईडी चौकशीचा प्रचंड दबाव असल्याने काहीतरी निर्णय घ्यावा लागेल, असंही ते खासगीत सांगतात. ना जेलमध्ये जायचं ना शिंदे गटात, अशी द्विधा मनस्थिती त्यांची झालेली आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून रवींद्र वायकर शिंदेसेनेत प्रवेश करतील, अशा चर्चांना उधाण आलं आहे.

उद्धव ठाकरे आणि वायकर यांच्यात काय चर्चा झाली?

त्याचवेळी रवींद्र वायकर यांनी आपली अडचण उद्धव ठाकरे यांच्याकडे बोलून दाखवली आहे. तुम्ही कट्टर शिवसैनिक आहात. संपूर्ण शिवसेना परिवार तुमच्या मागे उभा आहे. तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही. आपण शिवसेना सोडता कामा नये, असा आर्जव उद्धव ठाकरे यांनी केले आहे. परंतु जर तुमचे मन तुम्हाला शिंदे गटात जाण्याबद्दल सांगत असेल, तर तुम्ही आवश्य जा, असा मेसेजही ठाकरे यांनी वायकर यांना दिला आहे.

‘ठाकरेंची साथ सोडा, अन्यथा तुरुंगात जा’, वायकर यांना धमकी?

शिवसेनेतील आमचे सहकारी नेते रवींद्र वायकर यांना तपास यंत्रणांच्या माध्यमातून धमकावले जात आहे. ‘शिवसेना पक्ष सोडा, अन्यथा तुरुंगात जा’, असा वायकर यांच्यावर दबाव आणला जात असल्याचा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी केला. एकप्रकारे वायकर यांच्या आरोपाला दुजोरा देणारे ट्विट राऊत यांनी केले आहे.

संजय राऊत यांनी ट्विटरवर याबाबतचा दावा केला आहे. रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरीतील जमिनीच्या भूखंड घोटाळाप्रकरणी ईडीची कारवाई सुरू आहे. ईडीने त्यांची आधी चौकशी केली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी हा आरोप केला आहे.‘शिवसेनेतील आमचे सहकारी नेते आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून ईडी वगैरे तपासयंत्रणांच्या माध्यमातून प्रचंड दबाव आहे. येत्या काही दिवसांत शिवसेना सोडा. पक्षांतर करा. नाहीतर तुरुंगात जा असे त्यांना धमकावले जात आहे. हा दहशतवाद आहे. असे राजकारण याआधी कधीच घडले नव्हते’, असे राऊत यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *