• Mon. May 5th, 2025

कुणबी प्रमाणपत्रासाठी वंशावळी जुळविण्याकरिता तालुका स्तरावर समिती स्थापन -जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

Byjantaadmin

Feb 9, 2024

·        जिल्ह्यात सापडलेल्या नोंदणीची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध

·        नोंदी सापडलेल्या नागरिकांनी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

·        कुणबी नोंदींचे पुरावे असल्यास तहसील कार्यालयात सादर करावेत

लातूर, (जिमाका): जिल्ह्यातील कुणबी नोंदीधारकांच्या वारसांना जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही गतीने सुरु आहे. यासाठी वंशावळी जुळविण्याकरिता तालुकास्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे नोंदीधारकांच्या वारसांनी जात प्रमाणपत्रासाठी संबंधित महा ई-सेवा केंद्र अथवा तहसील कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे. तसेच जिल्ह्यात नागरिकांकडे 1967 पूर्वीच्या कुणबी नोंदीचे काही पुरावे असल्यास त्यांनी संबंधित तहसील कार्यालयातील एक खिडकी मदत कक्षात सादर करण्याचे पुनश्चः आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

जिल्ह्यात 1967 पूर्वीच्या अभिलेखांमध्ये कुणबी नोंदी शोधण्यासाठी मोहीम स्वरुपात कार्यवाही करण्यात आली आहे. त्यासाठी महसुली नोंदी, शिक्षण व आरोग्य विभागाच्या नोंदी, तसेच भूमी अभिलेख विषयक नोंदींची तपासणी केली जात आहे. या अभिलेखात सापडलेल्या नोंदींची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.latur.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली असून नोंदीधारकांच्या वारसांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही गतिमान करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत सापडलेल्या कुणबी नोंदीधारकांच्या वारसांनी संबंधित महा ई-सेवा केंद्र अथवा तहसील कार्यालयामध्ये जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

वंशावळी जुळविण्यासाठी तालुकास्तरावर समिती

नोंदीधारकांच्या वारसांना कुणबी जात प्रमाणपत्र प्राप्त करून घेताना वंशावळी जुळविण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध नाहीत किंवा असे पुरावे कशा प्रकारे उपलब्ध करून घ्यावेत, याबद्दल माहिती नसते. अशा प्रकरणात प्रत्येक तालुकास्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून या समितीला सहाय्य करण्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. या समितीमध्ये गट विकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, जिल्हा जात पडताळणी समितीमधील सहायक संशोधन अधिकारी, उर्दू भाषा व मोडी लिपी तज्ज्ञ यांचा समावेश असून महसूल नायब तहसीलदार हे समितीचे सदस्य सचिव आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *