यवतमाळ: आगामी लोकसभा निवडणुकींच्या जागांसाठी महायुतीकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. यात यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघातून मंत्री संजय राठोड यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू असताना चित्रा वाघ यांनी त्यांच्या उमेदवारीस विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे. वाघ या यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पुसद येथील पत्रकार परिषदेत त्यांनी हा विरोध दर्शवलाय. तसेच पूजा चव्हाण प्रकरणावरही चित्रा वाघ यांनी भाष्य केले आहे.यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांच्याऐवजी आमदार संजय राठोड यांच्या नावाची लोकसभा निवडणुकीसाठी जोरगार चर्चा होत आहे. अशातच चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या उमेदवारीला थेट विरोध दर्शविला आहे. तसेच महाविकास आघाडीनेच राठोड यांना क्लीनचिट दिल्याचा आरोपही वाघ यांनी केला आहे.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील उच्च न्यायालयातील माझा लढा सुरूच राहणार
संजय राठोड यांना जरी मंत्री केलं असेल तरी माझी पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील उच्च न्यायालयातील संजय राठोड विरोधातील माझी लढाई ही सुरू आहे आणि राहणार. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. मला निश्चितपणे न्याय मिळेल असे परखड मत चित्रा वाघ यांनी नोंदवले. महाविकास आघाडीने राठोड यांना क्लीन चिट दिल्यामुळे त्यांना महायुती सरकारने मंत्री केले. परंतु कोणी मंत्री असो संत्री असो मला काहीही फरक पडत नाही मी माझा लढा सुरूच ठेवणार अशा चित्रा वाघ म्हणाल्या.